चिपळूण – चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसी येथील पॅकिंग गोडाऊनमध्ये शालेय पोषण आहाराचे हजारो टन धान्य सडलेल्या अवस्थेत मिळाले. दुर्गंधी सुटल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या ठिकाणी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विनय नातू यांनी प्रत्यक्ष जाऊन या गोडावूनची पाहणी केली.

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळला जाणार हा प्रकार खूप धक्कादायक असल्याचे मत व्यक्त करत या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करुन तसेच या प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्याचा जो प्रयत्न ज्यांनी केलाय अशा सर्व संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी डॉ.विनय नातू यांनी केली. तसेच या प्रकरणामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि गोडाऊनचे कॉंट्रॅक्टर यांच्या मध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला. डॉ.नातू यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक नाईकवाडे यांची भेट घेऊन या प्रकरणात स्थानिक ग्रामस्थांवर कोणतेही गुन्हे दाखल न करण्याच्या सूचना केल्या. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष वामनराव पवार, जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, चिपळूण तालुकाअध्यक्ष विनोद भोबस्कर, जिल्हा संघटन सरचिटणीस नागेशजी धाडवे, जिल्हा चिटणीस संतोष वरेकर, तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, महाराष्ट्र कामगार संघटनेचे राजेश शेट्ये, युवा मोर्चा उपजिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ किलजे, खडपोलीचे जेष्ठ कार्यकर्ते ओंकार बापट, शरद तेवरे उपस्थित होते.