गुहागर – महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भावाने कहर केला असताना लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व खाजगी वाहतूक बंद आहे. असे असतानाही गुहागर ते मुंबई खुलेआम खाजगी ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅव्हल्सच्या ३ वाहनांना प्रत्येकी १२ हजार रूपयाप्रमाणे ३६ हजार रूपयाच्या दंडाची कारवाई गुहागर पोलिसांनी केली आहे.
गुहागर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक कदम यांनी पहाटे ५ वाजता या तीनही ट्रॅव्हल्स पकडून गुहागर पोलीस ग्राऊंडवर आणल्या होत्या. खाजगी बस प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी नाही. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतुकीला परवानगी नाही या खाली गुहागर तालुक्यातील सुंकाई ट्रॅव्हल्सच्या २ तर नवलाई ट्रॅव्हल्सच्या १ खाजगी बसवर प्रत्येकी १२ हजार रूपयाप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. १३ एप्रिल पासून कशेडी घाटात खाजगी छोट्या वाहनाने येणाऱ्यांची तपासणी केली जाते. मुंबईतून कोकणात यायचे झाल्यास ॲन्टीजंट टेस्ट यासारखे निर्बंध आहेत. असे असताना गुहागर तालुक्यातील काही ट्रॅव्हल्स खुलेआम प्रवासी वाहतूक करताना दिसून येत होत्या. यामुळे मुंबईतून अनेकजण कोकणात येत आहेत.
काही मोजक्या ट्रॅव्हल्स सुरू असल्याने नेहमीचे प्रवासी इतर ट्रॅव्हल्सकडे जातात. आम्ही बंद का ठेवावे असा सवाल तालुक्यातील इतर खाजगी ट्रॅव्हल्स मालकांनी गुहागर पोलिसांना केला तर ही दंडांची कारवाई होऊनही मुंबईकडून येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सचा ओघ सुरूच आहे. आरटीओ व पोलिसांचा मुंबईपासून कडेकोट बंदोबस्त असताना खुलेआम सुरू राहणाऱ्या या खाजगी ट्रॅव्हल्समागे नक्की कोणती सेटींग गेली केली असे सवालही तालुक्यातून केले जात आहेत.