वणवा……शापित कोकण

0
405
बातम्या शेअर करा

कोकणातील निसर्गाने आम्हा कोकणी माणसांना भरभरुन दान दिले आहे परंतु कोकणातील वर्षानुवर्षे निर्माण होणारी एक समस्या आहे जिच्यावर आजपर्यंन्त कोणीही उपाय योजले नाहीत किंबहुना तिच्यावर उपाय फक्त कोकणी माणसांची व कोकणात येणा-या पर्यटकांची मानसिकताच करु शकते. हि समस्या म्हणजे कोकणातील जंगलांना लागणारा वणवा.
पावसाळ्यात हिरवाई असणा-या कोकणात कातळावरही गवत उगवते. शेतक-यांचे मुळ पीक हे भात असल्याने भाताच्या पेंडीपासुन मुबलक प्रमाणात गुरांसाठी खाद्य उपलब्द् होते परिणामी उन्हाळी सुकलेले गवत कमी प्रमाणात कापले न गेल्यामुळे ते पडुन राहते.

रेल्वेमधुन किंवा महामार्गावरुन कोकणात प्रवास करीत असताना बरेच ठिकाणी रेल्वेरुळाच्या बाजुला वणवा मोठ्या प्रमाणात लागलेला दिसतो किंवा आग लागुन गेलेला असल्याने जमीनीच्या पृष्ठभागावरील गवत आगीच्या भक्षस्थानी येवुन काळाकुट्ट झालेला असतो. वणवा या समस्येमुळे कोकणातील डोंगर आठवडाभरही जळत राहतात. यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान होते. त्याचबरोबर नैसर्गीक साधनसंपत्तीचीही मोठ्या प्रमाणात हानी होते. पक्ष्यांची घरटी, त्यांची पिल्ले, अंडी आगीच्या भक्षस्थानी सापडतात. छोटे छोटे प्राणीही आगीच्या भक्षस्थानी सापडतात त्यांना श्वसनाचे आजार होतात , छोट्या छोट्या वनस्पती, नैसर्गिकरित्या जमीनीवर पडलेली बी बियाणी जळुन खाक होतात या वणव्याने वायुप्रदुषणाला मदत होत.
कोकणात लागणा-या या आगीची कारणे पाहिली तर नैसर्गीक आग लागण्याचे प्रमाण अत्यल्प असुन ती मानवनिर्मित कारणे जास्त आहेत. कोणी सिगारेटचे, विडीचे थोटूक रस्त्याकडेला किंवा धावत्या रेल्वेमधुन पटरीजवळ टाकतो त्या थोटकापासुन वणव्याची निर्मिती होते. ‘ जळो पण कोकण पिको ’ या उक्तिप्रमाणे काही वेळा शेतकरी शेतीची कामे करीत असताना थोड्याश्या दुर्लक्षामुळे आग कुंपणाबाहेर जाते व ती आटोक्यात न आल्याने त्याचे परिवर्तन वणव्यात होते. आपल्या जमीनीत नवीन गवत येणेसाठी जमीनीचा काही भाग जाळला जातानाही वणवा लागतो तर काही वेळा महावितरणाच्या विद्युत वाहिन्यांची ठिणगी पडुनही आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. काहीवेळेला निसर्गाप्रती प्रेम नसलेले लोकं, आपल्या एका अमानुष कृतीने काय विपरीत घटना घडू शकते याची जाणीव नसलेले लोक मुद्दामहूनही आग लावतात तर काही वेळा आपल्या नावे असलेल्या जमीनीचे क्षेत्र मोकळे करण्यासाठी आग लावतात. एक ना अनेक मानवनिर्मित कारणांमुळे कोकणातील जंगलांची वर्षानुवर्षे राख होतेे.या कारणांमुळे वणवेे लागण्याच्या प्रमाणाला आटोक्यात ठेवणे कोकणची भौगोलिक स्थिती पाहता शक्य नाही. सरकारी व राजकीय उदासिनतेमुळे उत्तर भारतासारखी सेवा आपल्या कोकण प्रांतात नाही. उत्तर भारतात भारतीय वायु सेनेची मिग – १७ जातीची विमाने पाण्याचा वर्षाव करुन जंगलांना लागलेली आग आटोक्यात आणतात.
कोकणातील गुहागरातील देवघर सारख्या परिसरात दरवर्षी वणवे लावले गेल्याने येथील बागायतीचे अर्थकारण हळुहळु संपुष्टात येण्याची भिती आहे. हे फक्त एका गावापुरेसे मर्यादीत नसुन त्याच्यासारख्याच वणव्याच्या झळा या मुंबई पुणे या शहरांकडे रोजगारासाठी पाठ फिरवुन कोकणाच्या मातीची सेवा करुन आपली रोजगारनिर्मिती करुन स्वयंप्रकाशीत होवु पाहणा-या युवकांना बसत आहेत.
निसर्गाने जे दान दिले आहे ते टिकवायचे असेल तर माणसाने उन्मत्त न होता जबाबदारीचे भान ठेवुन निसर्गाचे संरक्षण करायला हवे कारण मानवाची निष्काळजी वृत्तीच सजीवसृष्टीचे नुकसान करते. आपलंं एक पाऊल लाखो झाडे, पक्षी, प्राण्यांचे आयुष्याला जीवदान देवु शकतेे. आपण स्वत: निसर्गाची काळजी घेतली तर निसर्गही आपली व आपल्या भावी पिढ्यांची काळजी घेईल.
कोकणात या,इथल्या निसर्गाचा आनंद लुटा पण आनंद लुटताना इथल्या निसर्गाला नुकसान होईल अशी कसलीही कृती करु नका.

आशिष बल्लाळ
ashishballal007@gmail.com


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here