खेर्डी : निवडणुकीचा गावरान तडका!

0
258
बातम्या शेअर करा

चिपळूण तालुक्यातील खेर्डी ग्रामपंचायतीची निवडणूक नेहमीप्रमाणेच गाजू लागली आहे. गेली वीसबावीस वर्षे खेर्डी निवडणूक ही चिपळूण तालुक्याच्या राजकारणाची केंद्रबिंदू ठरत आली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काहीच चुरस नाही किंवा ती निरस वाटावी अशी परिस्थिती असते, मात्र एकदा का ग्रामपंचायत निवडणूक लागली की गावातल्या पोराटोरांपासून ते ज्यांची लाकडं स्मशानात जायची वेळ आली आहे अशांनाही एकदम उत्साह येतो. त्यामुळे जे नेते आहेत, सक्रीय कार्यकर्ते आहेत त्यांच्या अंगात निवडणूक भिनली नाही तरच नवल! खेर्डीची निवडणूक म्हणजे राजकारणाचा गावरान तडकाच…

देश किंवा राज्य पातळीवर मोठे झालेल्या नेत्यांनाही खेर्डी निवडणुकीचे राजकारण समजून घेणे सोपे नाही…एकवेळ भारत पाकिस्तान किंवा भारत चीन किंवा अमेरिका रशिया यांच्यातील राजकीय गुंतागुंत लवकर कळेल, पण येथील जयंद्रथ खताते आणि अनिल दाभोळकर या दोन गटातील राजकीय गुंतागुंत समजायला दहा वर्ष पुरायची नाहीत किंवा कदाचित आयुष्यही…खुद्द खेर्डीतील मतदारांचा गोंधळ उडतो तिथे बाहेरच्या लोकांना काही कळण्याचा प्रश्नच येत नाही. येथील निवडणुकीत कोणत्याच राजकीय पक्षाला स्थान नाही. येथील सर्व राजकारण हे जयंद्रथ खताते आणि अनिल दाभोळकर या दोन गटांत होते. या दोन गटांत सर्व पक्ष आणि कुटुंबही विभागली गेली आहेत. पंचायत समित्या, जिल्हा परिषद, आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुकात येथे पक्षीय राजकारण चालते, पण ग्रामपंचायत निवडणूक म्हटली की दोन गट पडलेच म्हणून समजा. बरं यात विचित्र गोष्ट म्हणजे दोन्ही गटातील छोटी प्यादी आणि सत्ता संपत्तीने बऱ्यापैकी मोठी झालेली प्यादी प्रत्येक निवडणुकीत कोणत्या गटात असतील हे खुद्द ब्रह्मदेवही सांगू शकत नाही. दर निवडणुकीत अंगावरची माशी झटकावी इतक्या सहजगत्या गट बदलले जातात.एक काळ ग्रामपंचायतीवर अनिल दाभोळकर यांचे वर्चस्व होते. अर्थात हा इतिहास झाला. त्यांनी ज्यांना गावच्या राजकारणात नवखे म्हणून आणले त्या जयंद्रथ खताते यांनी मोठ्या चातुर्याने आपले राजकीय बांधकाम मजबूत केले आणि श्रीमंत ग्रामपंचायतीच्या चाव्या आपल्या हाती ठेवल्या. अर्थात अनिल दाभोळकर यानाही निवडणूक खेळण्यात मजा येते. निकाल काही लागो पाच वर्षांनी थोडा चेंज म्हणून ते महिना दोन महिने निवडणुकीच्या खेळात अक्षरशः रंगून जातात. या काळात त्यांच्यातील दानशूरपणा अनेक पटींनी वाढतो असं लोक अभिमानाने बोलतात. तरीही खताते गट बाजी का मारतो याचे कोडे मात्र उलगडत नाही. अर्थात विकासकामांमुळे आपल्यावर मतदारांचा विश्वास आहे असा त्यांचा दावा असतो. गेल्या काही महिन्यात मात्र येथील गटाच्या राजकारणाचा नक्शाच बदलला. खताते यांच्या वर्चस्वाला त्यांच्याच कट्टर समर्थक प्याद्यानी आव्हान दिले ….आणि आता तर थेट दाभोळकर गटाचे प्रमुख सरदार म्हणून रणांगणात उतरले आहेत. त्यामुळे खताते गटासमोर प्रथमच कडवे आव्हान उभे राहिल्याचे जाणवत आहे. निवडणूक प्रचारात आता रंगत येऊ लागली आहे. दोन्हीकडचे सैन्य ‘करो या मरो ‘ अशा निर्धाराने लढायला सिद्ध झाले आहे. दाभोळकर गटाकडे दशरथी सेना आहे तर खताते यांच्याकडे यादवसेना आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत दोन्ही सेनापती काय काय व्यूहरचना आखतात आणि परस्परांना कसे कोंडीत पकडतात हे कळेलच आणि या सर्व शह काटशहच्या जाळ्यातून खेर्डीचा विजेता कोण बनतो याबाबत उत्सुकता आहे. पुढील पंधरा दिवस खेर्डीतील निवडणुकीला रोज दोन्ही गटाकडून जास्तीत जास्त तडका दिला जाईल यात शंका नाही.
पण या सर्व खेळात खेर्डीच्या विकासाचा खेळखंडोबा होणार नाही, ग्रामस्थांच्या अपेक्षांचा चुराडा होणार नाही याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. नाहीतर दोन्ही गटाचा महिना दोन महिने खेळ होतो आणि अनेक समस्या जैसे थे राहतात, मतदारांचा मात्र जीव जातो अशी परिस्थिती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. निवडणुकीचा ‘तडका’ संपला की पाच वर्षे विकासकामांचा ‘धडाका’ उडाला पाहिजे. मग कोणताही गट सत्तेवर येऊ दे.. निवडणूक झाली की गावच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून हातात हात घालून काम करण्याची बुध्दी दोन्ही गटांना दे हीच श्री देवी सुखाई चरणी प्रार्थना

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
९८५०८६३२६२


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here