गुहागर – गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागर या संस्थेतर्फे यंदाचा ६ जानेवारी २०२१ रोजी मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन कार्यक्रम पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृह येथे सकाळी ११.० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. पत्रकार दिनानिमित्त गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागर या संस्थेतर्फे समाजोपयोगी मोलाचे योगदान देणारे लोकप्रतिनिधी व अधिकारी तसेच उपस्थित मान्यवर यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री.संजय तात्याबा पवार यांनी ग्रामपंचायतीमार्फत समाजोपयोगी विविध उपक्रम राबवले आहेत. तसेच कोरोना (कोव्हिड – १९ ) या जागतिक समस्येच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवल्याबाबतची दखल शासनाने घेऊन शासनातर्फे पाटपन्हाळे ग्रामपंचायतीला पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. सरपंच संजय पवार यांच्या या कामाची व उपक्रमशिलतेची दखल गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागर या संस्थेने घेऊन सरपंच संजय पवार यांना “कार्यकुशल सरपंच “हा पुरस्कार जाहीर करून पत्रकार दिन कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. तसेच गुहागर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चरके यांनी गुहागर तालुक्यातील नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा व आरोग्यसेवा अथक प्रयत्नांनी देण्याचे योगदान दिले आहे. कोरोना समस्येच्या काळात डॉ.चरके यांनी विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवून तसेच आरोग्यविषयक सोयी-सुविधांचा वापर करून गुहागर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे. या सेवाभावी कार्याची दखल गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागर या संस्थेने घेऊन डॉ. चरके यांना “जनकल्याणकारक वैद्यकीय अधिकारी “हा पुरस्कार जाहीर करून पत्रकार दिनाच्या सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री रमेश बेंडल यांच्या नियोजनबद्ध कामकाजपद्धतीने ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबवून शासनातर्फे पुरस्कार प्रदान संपादन केले आहेत. ग्रामविकास अधिकारी रमेश बेंडल यांची कार्यपद्धती व अभ्यासवृत्ती याची दखल घेऊन गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागर या संस्थेने श्री. रमेश बेंडल यांना “कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार ” जाहीर करून सदर पुरस्कार पत्रकार दिन कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. गुहागर नगर पंचायतीचे सागरी सुरक्षा रक्षक श्री.प्रदेश तांडेल यांनी अनेक पर्यटकांचे प्राण वाचवून मोलाचे योगदान दिले आहे.या कामाची दखल घेऊन गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागर या संस्थेतर्फे प्रदेश तांडेल यांना गौरविण्यात येणार आहे.
सदर आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून गुहागरच्या तहसीलदार सौ. लता धोत्रे ,गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके , गुहागरचे गटविकास अधिकारी श्री.भोसले,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागर या संस्थेचे पत्रकार पदाधिकारी व सदस्य यांना गौरवण्यात येणार आहे. उपस्थित मान्यवरांचा स्वागत समारंभ संपन्न होणार आहे. सदरच्या आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात “पत्रकारीता ” या विषयावर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमासाठी निमंत्रित मान्यवर यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागरचे अध्यक्ष दिनेश चव्हाण व पदाधिकारी यांनी केले आहे.