खेड : खेड नगरपरिषदेच्या बांधकाम समितीवर शिवसेनेच्या सुरभी धामणस्कर यांची निवड झाली आहे. नगरपरिषदेत नगरसेवकांच्या संख्याबळावर अन्य सर्व समित्यांवर शिवसेनेचाच भगवा फडकला आहे. खेड नगरपरिषदेच्या विषय समित्याची निवड आज पार पडली. आज झालेल्या निवडीनुसार पाणी सभापती हे पद उपनगराध्यक्षांकडे पदसिद्ध असल्याने पाणी सभापतीपदी उपनगराध्यक्ष सुनिल दरेकर यांची निवड झाली आहे.
आरोग्य सभापती पदी प्रशांत कदम, समाजकल्याण समिती पदी सौ.रुपाली खेडेकर तसेच महिला बालकल्याण सभापती पदी सेनेच्या सौ.अल्पिका पाटणे व उपसभापतीपदी सेनेच्या सौ.मनिषा निर्मळ यांची निवड झाली आहे. महिला बालकल्याण समितीच्या चार सदस्य असतात. त्यामुळे सभापती व उपसभापती यांची निवड चिठ्ठ्या उडवून केली जाते. त्यामुळे ही निवड सुद्धा सेनेच्या बाजूने झाली आहे. तर स्थायी समिती ही सर्व समित्यांच्या सभापतींची असते व त्याचे पदसिद्ध सभापती म्हणून नगराध्यक्ष वैभव खेडेकर हेच राहणार आहेत.
नगरपरिषदेच्या आज झालेल्या या विषय समित्याच्या निवडणूकीत सेनेने बाजी मारल्याने पुन्हा एकदा खेड पालिकेमध्ये सेनेचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. सर्वच विषय समित्यावर निवडणून आलेल्या सभापती उपसभापती यांचे आमदार योगेश कदम यांनी सर्व नुतन सभापती आणि उपसभापतीं यांचे अभिनंदन केले.
यावेळी शहरप्रमुख निकेतन पाटणे, शिवसेना गटनेते प्रज्योत तोडकरी, संजय मोदी, अरविंद तोडकरी, मिनार चिखले, नागेश तोडकरी, विभागप्रमुख सुनिल धामणस्कर, दर्शन महाजन, प्रेमल चिखले यांच्यासह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.