दापोली मतदार संघातील ११७ पैकी ९० ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकेल-आमदार योगेश कदम

0
282
बातम्या शेअर करा

दापोली- ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर दापोली मतदार संघात शिवसेनेला अतिशय पोषक वातावरण असल्याने ११७ पैकी ९० ग्रामपंचायतीवर शिवसेनेचाच भगवा भडकेल असा विश्वास दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला. दापोली विधानसभा मतदार संघातील ११७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार योगेश कदम मतदार संघाचा दौरा करत असून या दरम्यान ते मतदाराशी संवाद साधत आहेत.
खेड येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, दापोली विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील शिवसैनिकांनी विधानसभा निवडणुकीत ते दाखवून दिले आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध अन्य सारे राजकिय पक्ष अशी सरळ लढत झाली होती. मात्र शिवसैनिकांनी घेतलेल्या परिश्रमांना यश आले आणि दापोली मतदार संघावर शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकू लागला.
विधानसभा निवडणुकीनंतर या मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास झाला. हा विकास शिवसेनेच्या माध्यमातून होत आहे हे येथी जनता ओळखून असल्याने येथील जनतेचा कौल हा शिवसेनेच्याच बाजूने असणार आहे. ग्रामपंचायत निवडणुक हा विकासाचा पाया आहे. कुठल्याही योजना या ग्रामपंचायत स्तरावर राबविल्या जातात आणि या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार सरपंच, उपसरपंच यांनी एकमेकांच्या सहकार्याने काम करणे गरजेचे असते. दापोली विधानसभा मतदार संघावर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे येथील जनता शिवसेनेच्याच बाजूने आपला कौल देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या वेळी प्रथमच सरपंच पदाचे आरक्षण ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीनंतर होणार आहे त्याचा काही परिणाम निवडणुकांवर होवू शकतो का? असे त्यांना विचारले असता त्याचा फारसा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकांवर होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here