समस्त भारतीय कोरोनाच्या सावटातून बाहेर पडू लागले आहेत. आठ नऊ महिने ठप्प झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. लोकं नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने कामाला लागली आहेत. अजून काही गोष्टी सुरू व्हायच्या आहेत, मात्र त्याही लवकरच मार्गी लागतील अशी चिन्हं आहेत. दोन तीन महिन्यांपूर्वी जे आत्यंतिक भीतीचे वातावरण होते ते आता राहिलेले नाही. काही अतिशहाणे सोडले तर बहुतांश जनता मास्क, योग्य अंतर आणि सॅनिटायझर याची अंमलबजावणी करताना दिसत आहे. शासनाच्या आवाहनाला आणि तज्ज्ञांच्या सूचनांना चांगला प्रतिसाद देत आहे. (जे प्रतिसाद देत नाहीत आणि बेजबाबदार वर्तन करतात ते स्वतःला समाजापेक्षा, तज्ज्ञांपेक्षा आणि विशेषतः देशापेक्षा मोठे समजत असावेत.) कोरोनाचे संकट आता फार गंभीर आहे असे न वाटण्याचे उत्तम लक्षण किंवा उदाहरण म्हणजे अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण अत्यंत उत्साहाने सुरू झाले आहे.
निवडणुका होत आहेत, होणार आहेत. अनेक महिने थांबलेली आंदोलनं जोरात सुरु आहेत. गुन्हेगारीला लागलेला ब्रेक आता सुटला आहे. खून, बलात्कार, दरोडे, हिंसाचार सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू झाले आहे. भ्रष्टाचार, लाचलुचपत, काळाबाजार असं बरंच काही आता गती घेऊ लागलं आहे. थोडक्यात सर्वच चांगल्या आणि वाईट पद्धतीचं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. आता सर्वांना फक्त एका गोष्टीची आतुरता आहे ती म्हणजे कोरोना प्रतिबंधक लसीची…
आपले मोदीजी या लस टोचणीचा मुहूर्त कधी जाहीर करतात याकडे सर्वांचे कान आणि डोळे लागून राहिले आहेत. ( घोषणेसाठी त्यांनी रात्री आठची वेळ निवडली तरी आता पूर्वीसारखी भीती वाटत नाही) ज्याअर्थी देशभर लस साठवणूक आणि प्रत्यक्ष लस टोचणी यासंदर्भात तयारी सुरू आहे, ट्रेनिंग दिले जात आहे त्याअर्थी नवीन वर्षाच्या सुरवातीलाच ही मोहीम सुरू होईल असे वाटते.
एकीकडे आपण या कोरोनाच्या भीतीतून बाहेर पडतो आहोत आणि लसीची उत्सुकतेने वाट पाहत आहोत अशावेळी मोबाईलवरील कोरोना कॅसेटने मात्र अक्षरशः नकोसे केले आहे. एरवी महानायक अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकण्यासाठी आतुर असलेले कान या
कोरोनाच्या कॅसेटमुळे किटले आहेत. जेव्हा कोरोनाचे संकट खूपच गंभीर होते, लोकांमध्ये जनजागृतीची नितांत गरज होती तोपर्यंत कॅसेट लावली हे ठीक आहे. पण आता त्याची फार आवश्यकता आहे असे वाटत नाही. गेल्या नऊ महिन्यांत लोकं चांगल्या रीतीने जागृत झाली आहेत.(आणि जे अतिशहाणे आहेत ते तुम्ही काय वाट्टेल ते केलेत तरी शहाणे होणार नाहीत हेही तितकेच सत्य आहे.) टीव्ही, वर्तमानपत्रं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्यारीतीने जागृती सुरू आहे त्यामुळे मोबईलवरची कॅसेट बंद केली तर समस्त जनतेवर कृपा होईल. दूरसंचार खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा आहे. सध्या मोबाईलवरून दिला जातोय तो जनजागृतीचा
‘ ओव्हरडोस ‘ आहे. त्यामुळे फायदा न होता तोटाच अधिक होत आहे. (भीक नको पण कुत्रा आवर असं इथे म्हणता येणार नाही..कारण इथे कोरोनापण नकोय आणि कॅसेटपण नकोय.) यामुळे तातडीच्या वेळी इतकी वाईट अवस्था होते ना की बोलायची सोय नाही. अपघात होऊदे, कोणावर अत्याचार होऊदे, कोणाला तातडीने पोलीस, वैद्यकीय मदत हवी आहे ती तुम्हाला बच्चन यांची कॅसेट ऐकल्याशिवाय मिळणारच नाही. एकदा हिंदीत ऐका मग इंग्रजीत ऐका आणि मगच तुम्हाला काय बोलायचे ते बोला, मदत मागायची ती मागा अशी विचित्र अवस्था संबंधित खात्याने करून ठेवली आहे. आधीच सगळ्या कंपन्यांची नेटवर्कची बोंब…एक फोन धड लागेल तर शप्पथ..आणि लागला तर आवाज ऐकू येईल याची खात्री नाही. त्यातच या कॅसेटची कटकट…हो खरंच कटकट वाटते. कारण ती आता इतकी गरजेची नाही. जेव्हा गरज होती तोपर्यंत ठीक होतं पण आता ती बंद केली पाहिजे. उगाचच गप्पागोष्टी करणाऱ्याला त्याचे कदाचित काही वाटणार नाही. परंतु इमर्जन्सी आणि महत्वाच्या कामावेळी या कॅसेटमुळे होणारी मनाची तगमग लाखो लोक अनुभवत आहेत. ज्यांना सातत्याने फोन करावे लागत असतील ते तर इतका वेळ कॅसेट ऐकून वेडेच होतील अशी परिस्थिती आहे. कोरोना सेंटर झाली आता
‘कॅसेट सेंटर’ सुरू करावी लागतील. त्यामुळे दूरसंचार खात्याने जनजागृतीच्या नावाखाली सुरू असलेला लोकांचा मानसिक छळ थांबवावा. लोकं कोरोनाच्या सावटातून बाहेर पडत असताना सतत कॅसेट लाऊन पुन्हा भीतीचं वातावरण तयार करण्याची गरज नाही. पुन्हा पुन्हा कोरोनाची आठवण करून देण्याची गरज आत्तातरी नाही. आणि द्यायचीच झाली तर त्यासाठी अन्य पर्याय वापरता येतील. संपर्कासाठी मोबाईलची आत्यंतिक गरज लक्षात घेऊन आता ही कॅसेट बंद करावी अशी समस्त
‘ कॅसेटग्रस्त ‘ भारतीयांची मागणी आहे, अपेक्षा आहे.
मकरंद भागवत पत्रकार चिपळूण.
९८५०८६३२६२