गुहागर ; शृंगारतळीतील शासकीय कार्यालये लाँकडाऊन,दूरध्वनी कार्यालयही बंद

0
401
बातम्या शेअर करा

गुहागर – पाटपन्हाळे येथील दुरुस्तीअभावी दोन वर्षे बंद असलेल्या तलाठी कार्यालयाचा विषय चर्चेत असताना आता पाटपन्हाळे ग्रामपंचायत क्षेत्रातील शृंगारतळी बाजारपेठेतील कायमचे कुलूपबंद असलेले दूरध्वनी येथील व्यापारी, ग्रामस्थ यांचे लक्ष वेधून घेत आहे. गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या या मिनी शहरातील येथील शासकीय कार्यालयांना एवढी घरघर का लागली, असा सवाल येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
शृंगारतळी भर बाजारपेठेत दूरसंचारचे दूरध्वनी कार्यालय आहे. चौकशीअंती हे कार्यालय नेहमीच बंद असल्याचे सांगण्यात येते. येथे एकही अधिकारी, कर्मचारी नियुक्त नाही. त्यामुळे येथील समस्या सोडविण्यास गुहागर येथील कार्यालयावरच अवलंबून रहावे लागते. येथे तांत्रिक प्रकार उद्भवल्यास गुहागरमधून अधिकारी, कर्मचारी येऊन येथील तांत्रिक दोष दूर करतात. येथे मोबाईल टाँवरही आहे. मात्र, वीज गायब झाली की, हा टाँवर बंद पडतो. तो कार्यान्वीत करण्यासाठी येथे जनरेटरही नाही. गेली एक वर्षे येथे जनरेटर नसल्याचे गुहागर कार्यालयातून सांगण्यात आले. शृंगारतळी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे नेहमीच बाहेरील नागरिकांची वर्दळ असते. दूरसंचारचे ग्राहकही सर्वात जास्त आहेत. येथील मोबाईल टाँवर हा अनेक गावांना जोडला गेला आहे. त्यामुळे हा टाँवर महत्वाचा ठरलेला आहे. कधी वीज गेल्यास हा टाँवर बंद पडतो. जनरेटर नसल्याने टाँवर कार्यान्वीत होत नाही. त्यामुळे येथील मोबाईल सेवा पूर्णतः कोलमडते. स्थानिक ग्राहक, व्यापारी यांनाही याचा मनःस्ताप होतो. विशेष म्हणजे या टाँवरला एकूण 4 फिडर असून यातील केवळ एकच फिडर चालू आहे.
गुहागर येथे दूरसंचारचे मुख्य कार्यालय आहे. येथेही वरिष्ठ अधिकारी पद रिक्त असून गेले वर्षभर या पदाचा अतिरिक्त भार कनिष्ठ दूरसंचार अधिकारी घडशी यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. संपूर्ण तालुक्यात दूरध्वनीचे एकूण 26 मोबाईल टाँवर असून येथील गावांतून येणाऱ्या तक्रारींचे निवारण करते एका अधिकाऱ्याला कठीण होते. कर्मचारी संख्याही कमी असल्याने तांत्रिक दोष निर्माण झाल्यास तो दूर करण्यासाठी अधिकाऱी व कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. शृंगारतळीतील दूरध्वनी कार्यालयासाठी कर्मचारी व टाँवर कार्यान्वीत करण्यासाठी जनरेटर आदी मागण्या वरिष्ठ स्तरावर करण्यात आल्याची माहिती घडशी यांनी दिली.
दरम्यान, शृंगारतळीतील दूरध्वनी कार्यालयाबाबतच्या समस्या न सोडविल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शृंगारतळी शिवसेना शहरप्रमुख नरेश पवार यांनी दिला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here