चिपळूण- केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली असून यामुळे गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीत ‘न भूतो न भविष्यती’ असे आंदोलन पुकारले आहे. तरीही मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे शेतकरी संघटनांनी ८ रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. या बंदला काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी पाठिंबा दर्शवला असून चिपळुनातील जनतेने या आंदोलनाला पाठींबा म्हणून सोशल मिडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात. तर व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले आहे.
मोदी सरकारने ‘काळ्या कायद्यांच्या’ माध्यमातून देशातील ‘ हरित क्रांती’ नष्ट करण्याचा कुटील डाव आखला आहे. जगाचा ‘पोशिंदा’ अन्नदाता, शेतकरी, यांना काही उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचे हे मोठे एक षडयंत्र आहे. आज देशभरातील 62 कोटी शेतकरी, कामगार व २५० , अधिक शेतकरी संघटना या ‘ काळ्या कायद्याविरोधात’ आवाज उठवत आहेत. गेले अनेक दिवस देशातील शेतकरी दिल्लीच्य वेशीवर आंदोलन करीत आहेत. त्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी सरकारने दिल्लीच्या सीमेवर अडवून धरले आहे. मोदी सरकारच्या मुर्दाडपणा विरोधात देशातील शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी बळीराजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा आदेश देशभरातील काँग्रेसजनाना दिला आहे.
या अनुषंगाने चिपळूण काँग्रेसच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून जनतेनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात. तसेच व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी स्वयंस्फूर्तीनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले आहे.