डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे नाव जगभरात विद्वान म्हणुन आदरपुर्वक घेतले जाते. जगभरातील लाखो विद्यार्थी त्यांच्या जीवनावर व त्यांनी लिहीलेल्या पुस्तकांवर शोधनिबंध लिहीतात. आपल्या देशात मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वैचारीक स्विकारले गेले आहेत असे मला वाटत नाही कारण आजही डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांचे नेते असे संबोधले जाते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपण केवळ विशिष्ठ समाजापुरेसे त्यांच्या कार्याचे आकलन करुन त्यांच्याविषयी बोलुन त्यांनी भारत देशासाठी केलेल्या कार्याकडे आपण दुर्लक्षीत करतो. जातीपातीच्या पलिकडे जावुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भावनीक न समजावुन घेता ते वैचारीक समजावुन घेतले तर त्यांचा जगभरात गाजावाजा का केला जातो याचे उत्तर आपल्याला मिळेल.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाच्या जडणघडणीस महान कार्य केले आहे. त्यांना केवळ दलितांचे उद्धारक संबोधुन त्यांच्या महान कार्याचा आपण अपमान करतो. त्यांनी भारत देशातील महिलांसाठी केलेले कार्य जाणीवपुर्वक दुर्लक्षीत केले जाते किंबहुना ते सर्वसामान्य स्त्रीयांना सांगीतलेही जात नाही. देशातील स्त्रीयांना पुरुषांसारखी समान वागणुक मिळावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य हे अमुल्य आहे. ज्या काळात भारत देशात स्त्री -पुरुष असा भेदभाव केला जात होता त्या काळात देशाची प्रगती मोजण्याची फुटपट्टी काय असावी याबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की , ‘ ज्या देशात स्त्रीयांची आर्थिक व सामाजिक प्रगती झाली असेल तोच देश प्रगत मानला पाहीजे ’. त्यासाठीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव न करता समान कामाला समान दाम कायदा आणला. जो पती एखादया पत्नीला मानसिक अथवा शारिरीक त्रास देत असेल तर तिला त्याच्यापासुन फारकत घेण्याचा अधिकार त्यांनी मिळवुन दिला. महिला कामगारांचे संरक्षण कायदा , महिला प्रसुती पगारी रजेचा ठराव असे विवीध कायदे व ठराव संसदेत मांडुन ते त्यांनी ते संमत करुन घेतले. अमेरीकेसारख्या विकसीत देशातही महिलांना मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी मोठा लढा दयावा लागला होता मात्र भारतीय महिलांना भारतीय संविधानातुन मतदानाचा हक्क देवुन त्यांचे सबलीकरण करणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे ख-या अर्थाने भारत देशातील समस्त स्त्रीयांचे उद्धारकर्ते आहेत. खेद एवढ्याच गोष्टीचा वाटतो की, ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्माच्या स्त्रीयांच्या उद्धारासाठी रात्रंदिवस जागुन कष्ट केले ,पुरुषसत्ताक मानसिकतेच्या विरोधात जाऊन स्त्रीयांना त्यांचे हक्क मिळवुन दिले त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची जाणीव भारतातील बहुसंख्य महिलांमध्ये क्वचितच असल्याचे दिसुन येते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सन २००० मध्ये भारतीयांना किती पाणी लागेल याचा आराखडा सन १९४२ साली तयार केला. ज्या माणसाच्या पुर्वीच्या कित्तेक पिढया थेंब थेंब पाण्यासाठी आक्रोशल्या होत्या तोच माणुस भारत देशाच्या उज्वल भविष्यासाठी पुढच्या ६० वर्षाच्या पाण्याचे नियोजन करुन सर्वकष पायाभूत सुविधांची जबाबदारी उचलत होता. त्यासाठी त्यांनी देशातील पंधरा धरणांच्या कामाची सुरवात केली त्यात हिराकुड धरण , दामोदर खोरे प्रकल्प , ओरीसा नदी ,भाक्रा नांगल धरण इ.देशातील महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. देशातील मोठमोठया नदया एकमेकींना जोडल्या तर बारमाही पाणी मिळुन भारतातील शेतीपुरक व्यवसायाला चालना मिळेल असे त्यांना वाटले. सध्या चर्चेत असलेल्या ‘नदीजोड प्रकल्पाचे ’ जनक हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरच आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या ‘ द प्रॉब्लेम ऑफ रुपी ’ या ग्रंथाने ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ च्या स्थापनेत महत्वाची भुमीका निभावली आहे. कामगारमंत्री असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांचे कामाचे तास १२ तासांवरुन ८ तास केले. ओबीसींना आरक्षण मिळावे यासाठी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारत देशातील एकमेव लोकनेता आहेत. ओबीसींसाठी संविधानात हक्क मिळवुन देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे या देशातील सर्वात मोठ्या जनसमुदायाचे उद्धारकर्ते आहेत.भारतीय संविधानाच्या पहिल्या प्रतीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अलौकीक महत्व दिले आहे. भारतासारखा विशाल देश हा आदर्शपणे चालावा यासाठी त्यांनी संघराज्यातील लोकशाहीचा आत्मा या प्रकरणाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला होता. त्या फोटोमागे लाल किल्ला असुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना असे अभिप्रेत होते की , या भारत देशाचे दिल्लीतील चालणारे सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालले पाहीजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे त्याकाळात राजेशाही असताना अठरापगड जातींना एकत्र करुन लोककल्याणकारी धर्मनिरपेक्ष राज्य करुन जो मानदंड जगाला घालुन दिला त्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अभिवादन केले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी त्यांचे लाखो अनुयायी मुंबई येथील चैत्यभुमीवर नतमस्तक होतात. जगाच्या इतिहासात एका व्यक्तिच्या स्मृतिदिनी एकाच ठिकाणी लाखो अनुयायी एकत्र येवुन नतमस्तक होतात व करोडो रुपयांच्या पुस्तकांची खरेदी करतात असे ऐकवित नाही. म्हणुनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळारुपी स्मारक बांधण्याऐवजी त्यांच्या नावाने एखादे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विदयापिठ इंदू मिलच्या जागी उभे रहावे व जगभरातील विद्यार्थ्यांना या विद्यापिठातुन दर्जेदार शिक्षण मिळावे असे मला वाटते.
भारतीय संविधान लिहुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर नव्या युगाच्या भारताचे ‘ युगप्रवर्तक ’ झाले म्हणुनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाची मालकी नसुन संपुर्ण भारत देशाची अस्मिता आहे. अशा या युगप्रवर्तकाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम !
- आशिष प्रकाश बल्लाळ, रत्नागिरी ashishballal007@gmail.com