गुहागर – वनविभागात धाडसी कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दरवर्षी राज्य शासनामार्फत गौरव केला जातो. वनसेवेतील १८-१९ वर्षासाठीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वन व वन्यजीव संरक्षणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये कार्यरत असलेले वनरक्षक रामदास खोत यांना सुवर्णपदक जाहीर झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात वनविभागात सुवर्ण पदक प्राप्त करणारे क्रोकोडाईल मॅन, वनरक्षक रामदास खोत हे पहिलेच कर्मचारी आहेत. खाडीपट्टयात मगरींना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात खोत यांचा सिंहाचा वाटा आहे. रक्तचंदन तस्करीप्रकरणाच्या तपासातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीची दखल घेत शासनाकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
वनविभागामध्ये गेली चौदा वर्ष रामदास खोत हे वनरक्षक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड, चिपळूण परिक्षेत्रात व सध्या गुहागर येथे कार्यरत आहेत. कमी कालावधीत सुवर्णपदक पटकावण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. राज्यातील सुमारे आठ ते नऊ हजार वनरक्षकांमधून सुवर्णपदकासाठी असून त्यात रामदास खोत यांचा समावेश आहे. राज्यातील एकूण 30 अधिकारी व कर्मचार्यांना सुवर्ण व रजतपदक जाहीर करण्यात आले आहे. वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हे पुरस्कार जाहीर केलेले आहेत.
खेड, चिपळूणच्या खाडीपट्टयात असो की चिपळूण शहरामध्ये मोठ्याप्रमाणात मगरींचे वास्तव्य आहे. या मगरी अनेक वेळा विशेषत: पावसाळ्यामध्ये नागरीवस्तीत घुसत असतात. यावेळी रामदास खोत यांच्याशी नागरिक संपर्क करून, मदतीची विनंती करीत असतात. श्री.खोत हे आपल्या सहकार्यांच्या मदतीने मगरींना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची कामगिरी बजावत असतात. मगरींना पकडण्यात खोत यांचा विशेष हातखंडा आहे. मगरींप्रमाणेच अनेक बिबट्यांनाही त्यांनी जीवदान देत वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. वनविभागाच्या झाडे लावा अभियानामध्येही त्यांनी चिपळूण व गुहागरमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. बेकायदा वृक्षतोडीला लगाम बसावा यासाठी ते वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात जागृती करण्यात महत्वाची भूमिकाही बजावत आहेत. तीन वर्षापूर्वी चिपळूण येथे पकडण्यात आलेल्या रक्तचंदन तस्करीच्या तपासातही रामदास खोत यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहिती आधारे एका बंद फ्लॅटमध्ये लपवून ठेवलेले रक्तचंदन त्यांनी शोधून काढण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. कोल्हापूरचे मुख्यवनरक्षक क्लेमेंट बेन, विभागीय वनधिकारी दीपक खाडे, परिक्षेत्र वनाधिकारी सचिन निलख यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील वनविभागाकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.