खेड -महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई येथील अधिकाऱ्यांनी लोटे औद्योगिक वसाहतीला अचानक भेट देवून येथील मोठ्या रासायनिक कारखान्यांची तपासणी केल्याने रासायनिक कारखानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. काल सायंकाळ पासून सुरु झालेल्या या तपासणीदरम्यान या पथकाने नेमकी काय तपासणी केली हे मात्र समजू शकले नाही.
लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाण्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात जलप्रदुषण होत असल्याचा तक्रारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे येत आहेत. या तक्रारी सुरु असतानाच महामार्गावरील आवाशी फाटा येथे रस्त्यालगत वाहणाऱ्या नाल्यात घातक रसायन ओतताना दोन टँकर चालकांना सोहाथ पकडण्यात आले होते. या टँकरचालकांनी दिलेल्या माहितीवरून ते घातक रसायन वनवीड आणि योजना इंडस्ट्रिज या रासायनिक कारखान्यांचे असल्याचे स्पष्ट झाले होते.
या पार्श्वभुमीवर परिसरातील ग्रामस्थ तसेच राजकिय पक्षांनी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. दरम्यान शुक्रवार दिनांक ४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई येथील कार्यालयातील दोन पथके लोटे औद्योगिक वसाहत येथे दाखल झाले. या पथकांनी येथील घरडा, एक्सल, पुष्कर, सुप्रिया लाईफ सायन्स, विनिती, युएसव्ही, कसाई नेरोलक, तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची तपासणी केली.
या पथकाने नेमकी काय कारवाई केली? या कारवाईत त्यांना कोणत्या कारखान्यात काय आक्षेपार्ह आढळून आले हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या स्थानिक कार्यालयाकडे संपर्क साधला असता स्थानिक कार्यालयाला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.