चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे बाजारपेठेतील एका जनरल स्टोअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आला आहे. गुटखाबंदी असतानाही जनरल स्टोअर मध्ये गुटख्याचा साठा आणि विक्री सुरू असल्याप्रकरणी सावर्डे पोलिसांनी अमित कोकाटे वर गुन्हा दाखल केला आहे.
काल सकाळी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सावर्डे येथील जनरल स्टोअरमध्ये छापा टाकण्यात आला. या ठिकाणी ७५हजार ६४५ रुपयांचा गुटखा, तंबाखू साठा आढळून आला. या प्रकरणी व्यापारी अमित कोकाटे याला अटक करण्यात आले असून त्याची अधिक चौकशी पोलीस करत आहेत.
याही आधी सावर्डे बाजारपेठेत अशाप्रकारे मोठी कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने केली होती मात्र असे असतानाही सावर्डे बाजारपेठेत गुटखा साठा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने सखोल चौकशी करून बाजारपेठेतील सर्व गुटखा नष्ट करावा अशी मागणी जनतेतून केली जात आहे.