चिपळूण : चिपळूण तालुक्यातील कोयना प्रकल्पाच्या अलोरे येथील शासकीय जागेत अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट सुरू झाला असून पक्षाचे बडे पुढारीच आता अनधिकृत बांधकाम करत असतील तर त्याला नेमकं काय म्हणावे हाच सवाल सर्व सामान्य मधून उपस्थित झाला आहे. मात्र या सर्व प्रकारात शासकीय अधिकारी कोणाच्या आशीर्वादाने मूग गिळून गप्प बसले आहेत. याचीच चर्चा सध्या संपूर्ण चिपळूण तालुक्यात सुरू आहे.
कोयना प्रकल्पाच्या अलोरे येथील काही कार्यालय स्थलांतर झाल्यानंतर अलोरे परिसर ओस पडले होते. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या अलोरेत शुकशुकाट असताना आता अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणत होत आहेत. लॉकडाऊन काळात भाजी- मंडईमध्ये अनधिकृत बांधकाम बांधण्यास सुरुवात झाली त्यावेळी येथील प्रकल्पग्रस्त यांनी त्याबाबत आवाज उठविला होता. त्यानंतर शासकीय अधिकारी थोडे जागे झाले आणि फक्त त्या अनधिकृत बांधकाम धारकांना नोटीस देण्यापर्यंत कामगिरी केली त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त याचा सुद्धा आवाज दाबण्यात आला त्यानंतर काही दिवसांपासून अलोरे येथील बस स्टॉपवर खुलेआम पक्के अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे. आणि याकडे मात्र अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अधिकारी यांच्या भूमिकाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. अधिकारी असे का वागत आहेत ? खुलेआम सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम बंद का करण्यात येत नाही.? की यामध्ये अधिकारी व बांधकाम धारक यांच्यामध्ये साटेलोटे तर नाही ना ? असा खडा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे यामध्ये एकच दिसून येत आहे आंधळे दळतय कुत्र पीठ खातय .