गुहागर – (मंगेश तावडे ) – गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील तलाठी कार्यालय गेली 2 वर्षे दुरुस्तीअभावी धूळखात पडलेले दिसून येत आहे. या कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी तालुका प्रशासनाकडे सातत्याने ग्रामस्थांनी पत्रव्यवहार करुनसुध्दा याकडे दुर्लक्ष होतअसल्याने सध्या तलाठी कार्यालय एका भाड्याच्या खोलीत सुरु असून तलाठ्याला येथूनच आपला कारभार सुरु ठेवावा लागल्याचे दिसून आले.
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे हे सर्वात मोठे गाव आहे. सुमारे 6 हजार लोकसंख्येचे हे गाव विकासात सध्या एक पाऊल पुढे आहे. शृंगारतळीसारखी मोठी बाजारपेठ येथे असून तालुक्याची ती आर्थिक राजधानी ओळखली जाते. अशा या गावात महसूलच्या तलाठी कार्यालयाची दुरुस्तीअभावी बंद आहे. शृंगारतळी-गुहागर मार्गावरील पाटपन्हाळेच्या गावच्या मुख्य बसथांब्यावर ही इमारत एका बाजूला दिसून येते. या इमारतीच्या बाजूने मोठी झाडे, झुडपे असून जणूकाही ही इमारत कित्येक वर्षांचा वनवास भोगत असल्यासारखी वाटते. इमारत तशी मोठी आहे. एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या या गावाच्या ललाटी ही तलाठी कार्यालयाची इमारत दुरुस्तीअभावी का बंद आहे, हे अद्याप येथील ग्रामस्थांना उमजलेले नाही. ही इमारत महसूलच्या जागेत असताना व कोणतीही अडचण नसताना केवळ बांधकाम विभागाच्या अनास्थेमुळे तिची दुरुस्ती झालेली नसल्याची माहिती येथील ज्येष्ठ ग्रामस्थ अनंत चव्हाण यांनी दिली.
अलिकडे कित्येक गावपातळीवर सरकारी कार्यालये उभारण्यासाठी इंचभरही जागा कोणीही देत नाही. कित्येक गावांमध्ये जागांच्या बक्षिसपत्रांअभावी सरकारी इमारतींची कामे, विकासकामे खोंळबलेली दिसून येत आहेत. अशा स्थितीत बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या जागेत पाटपन्हाळेचे हे तलाठी कार्यालय मुख्य रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी असूनसुध्दा केवळ दुरुस्तीअभावी दोन वर्षे बंदअवस्थेत ठेवण्यात आलेले आहे. प्रचंड लोकसंख्या असलेल्या या गावाचे तलाठी कार्यालय गेली दोन वर्षे एका भाड्याच्या खोलीत सुरु आहे. या खोलीची पाहणी केली असता, कामकाजाच्यादृष्टीने ही जागा अपुरी असल्याचे दिसून आले. पाटपन्हाळे गाव विकासात पुढारलेले आहे. या गावाला तरुण तडफदार सरपंच लाभले आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक विकासकामे केलेली आहेत. ग्रामपंचायतीची भव्य इमारत, सभागृह, इतर सरकारी कार्यालये चांगली सुस्थितीत आहेत. त्यामुळे येथील लोकांच्या सोयीसाठी अधिक महत्वाच्या ठरलेल्या तलाठी कार्यालयाच्या इमारतीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.