अखिल महाराष्ट्र वाळूचोर संघटनेचे एक रात्रीय संमेलन नुकतेच कोकणातील प्रसिद्ध अशा दाभोळ खाडीत ड्रेझर्स, सेक्शन पंपांच्या खडखडाटात, हत्यारांच्या खणखणाटात , दगडगोट्यांच्या आतिषबाजीत आणि शिव्यांची लाखोली वाहून अपूर्व उत्साहात पार पडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोका लक्षात घेऊन सर्व उपस्थित मान्यवर आणि सभासदांनी आपापसात वाळूच्या कणाएवढे अंतर पाळले होते. हात धुण्यासाठी खाडीच्या खारट पाण्याची व्यवस्था होतीच. चोर म्हटल्यावर मास्क हा आलाच. हजारो वर्षांपासून चोरांना मास्कचे महत्त्व पटलेले आहे. (आपल्यासारख्या सामान्य माणसाला कारोनामुळे त्याचे अप्रूप वाटते इतकेच) या संमेलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वच्या सर्व वाळूचोर झाडून उपस्थित होते. या क्षेत्रात भरीव कामगिरी करून राजकारणात सक्रीय झालेले खासकरून उपस्थित होते. त्यांचे मौलिक मार्गदर्शन नेहमीप्रमाणे गरजेचे होतेच. त्याशिवाय या क्षेत्रातील अनेक मातब्बर मंडळी, वाळूचोरांची युवा पिढी, या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणारे अशांची उपस्थिती लक्षणीय होती. ही लक्षणीय उपस्थिती पाहून काही क्षण दाभोळ खाडीचे पाणीही शहारले असे म्हणतात.
या एक रात्रीय संमेलनात अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच अनेक ठरावही संमत करण्यात आले. अखिल महाराष्ट्र वाळूचोर संघटना अखिल भारतीय वाळूचोर संघटनेशी संलग्न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. वाळू चोरीतील अधिक कौशल्यप्राप्तीसाठी प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यातील वाळू माफियांकडून मार्गदर्शन घेण्याचाही आग्रही भूमिका मांडली गेली. अहमदनगर, दौंड परिसरातील वाळूचोर ज्याप्रमाणे जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, सर्कल, तलाठी तसेच तक्रार करणाऱ्या नतद्रष्ट ग्रामस्थांवर डंपर, ट्रक, ट्रॅक्टर घालून शांततेच्या मार्गाने लढा देतात त्याच पद्धतीने संपूर्ण राज्यात असा लढा देता येईल का याबाबतही संमेलनात विचार विनिमय करण्यात आला. पुढील वर्षी वाळूचोरांच्या पंढरीत दौंडमध्येच भव्य- दिव्य संमेलन घेण्याचा आणि त्यासाठी उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश येथील एकापेक्षा एक सरस अशा वाळूचोरांच्या सरदारांना, सम्राटांना बोलविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.दाभोळ खाडीत झालेल्या या एक रात्रीय संमेलनात ‘ वसूल ‘ च्या अनेक आजी माजी तज्ज्ञ अधिकाऱ्यांची मार्गदर्शनपर व्याख्याने झाली.
‘ वसूल ‘ च्या अधिकाऱ्यांनी वाळू चोरीतील, शासनाच्या फसवणुकीतील बारकावे समजावून सांगितले. तसेच चोरांच्या नजरेतून सुटलेल्या अनेक पळवाटाही दाखवून दिल्या. या संमेलनात नतद्रष्ट प्रामाणिक व्यावसायिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या चौर्यकर्मात येणारा अडथळा दूर करण्यासाठी भविष्यात अधिक प्रभावी रणनिती ठरविण्यावर ही एकमत झाले.
दरम्यान, या एक रात्रीय संमेलनाचे उद्घाटन अवैध उत्खनन केलेल्या वाळूची एक बार्ज मुंबईकडे तर एक होडी जवळपासच्याच एका अज्ञात वाळू डेपोकडे पाठवून करण्यात आले. बार्जला मोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी तर होडीला
गावपुढाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत रॉयल्टीच्या बोगस पावत्यांचे प्रकाशन करण्यात आले आणि लगेच वाटपही…
संमेलनाच्या सुरवातीला वाळू चोरांच्या दोन गटांमध्ये कोणत्या गटाच्या म्होरक्याला अध्यक्ष करायचे यावरून
आदळआपट झाली. मात्र संमेलनात वादावादी नको म्हणून एका गटाला अध्यक्षपद तर दुसऱ्या गटाला प्रमुख अतिथीपद देण्यात आले. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी फटाक्यांच्या आतिषबाजीची वाईट प्रथा बाजूला ठेवून ( आणि त्यात कोरोना संकट) परस्परांच्या कार्यालयांच्या काचा फोडून ‘ खळ्ळ .. खट्याक ‘ करण्यात आले. उद्घाटनपर भाषणात प्रमुख अतिथीनी सर्व वाळूचोरांना धन्यवाद दिले. गेल्या पंचवीस तीस वर्षांत ज्या आत्मियतेने, ज्या जिद्दीने प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तसेच कडक कायद्यांचा अडथळा पार करीत वाळूचोरी केली त्याबद्दल कौतुक केले. अफाट वाळूचोरीमुळे सर्वसामान्य जनतेला घरे बांधण्याचा कामात फार मोलाची मदत झाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. वाळूचोरी करताना ज्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी मोलाची साथ दिली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना प्रमुख पाहुण्यांचे डोळे भरून आले. प्रमुख पाहुण्यांचे डोळे भरून येताच उपस्थित हजारो वाळू चोरांच्याही डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. त्याने इतके मोठे रूप धारण केले की या अश्रूधारांची नदी होऊन ती खाडीमार्गे अरबी समुद्राला मिळाली. शेवटी कसेबसे सर्वांनी आपले अश्रू आवरले. प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर लगेचच सहकार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या त्यांच्या खुर्चीनुसार
‘ नजराणे ‘ भेट देण्यात आले. याप्रसंगी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात या क्षेत्रात काम करताना येणाऱ्या विविध अडचणी, समस्यांवर सखोल विचार करण्यात येऊन मागण्यांचे अनेक ठराव संमत करण्यात आले. त्यापैकी प्रमुख ठराव किंवा मागण्या अशा……वाळू चोरी करताना होणारे अपघात लक्षात घेऊन शासनाने सर्व चोर सदस्यांचा विमा उतरावा….याकामी लागणाऱ्या डिझेलवर सबसिडी द्यावी….शासनाने रॉयल्टीची त्रासदायक प्रथा संपुष्टात आणावी….वाळू गटांचे लिलाव वगैरे भानगडी बंद करून सर्व नद्या, खड्या वाळू चोरांना
‘ आंदण ‘ द्याव्यात….वाळूच्या महान चौर्यकर्मात विनाकारण अडथळा आणू पाहणाऱ्या प्रामाणिक अधिकारी, कर्मचारी, समाजसेवी, पर्यावरण प्रेमी संस्था आणि पत्रकारांना संपूर्ण खाडी आणि नद्यांचे क्षेत्र हे
‘ प्रवेश निषिद्ध ‘ करावे. त्यातूनही कोणी घुसखोरी केली आणि विनाकारण बोंबाबोंब केली तर त्याला खाडीत बुडवून मारण्याच्या शिक्षेची तरतूद करावी….वाळू
चोरांच्या म्होरक्याना पोलिसांनी योग्य ती सुरक्षा द्यावी…..वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर, ट्रॅक्टर चालकांना रस्त्यांचा उपयोग विमानाच्या धावपट्टीसारखा करण्याची मुभा मिळावी तसेच किमान दोन अपघात तरी क्षमापात्र करावेत.
संमेलनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षांचे अत्यंत जोषपूर्ण भाषण झाले. अध्यक्ष भाषणाला उठताच
‘ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं ‘ ,
‘ वाळूचोर एकतेचा विजय असो ‘ ,
‘ खाड्या आमच्या मालकीच्या, नाही कोणाच्या बापाच्या ‘ ,
‘ हमसे जो टकराएगा , वाळू में मिल जाएगा ‘
अशा घोषणांनी दाभोळ खाडीचा परिसर दणाणून सोडण्यात आला. या घोषणांमुळे खाडीतील मासे, मगरी काहीकाळ सैरावैरा पळत असल्याचे दृष्य पाहण्यास मिळाले. अध्यक्षांनी सुरवातीलाच आपल्यात कदाचित मतभेद होत असतील,
भांडणतंटा होत असेल पण शत्रूसमोर लढताना एक आहोत हे आपण विसरलो नाही याचे करावे तेवढे कौतुक थोडेच असल्याचे सांगितले. वाळूचोरीचे प्रमाण दिवसेंदिवस कसे वाढवता येईल यासाठी सर्वांनी दिवसाची रात्र करून प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी प्रतिपादन केली. वाळूची चोरी करताना नतद्रष्ट लोकांशी लढताना ज्यांनी ज्यांनी आपले प्राण गमावले , जेल भोगला त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खाडीच्या मधोमध चंद्रावरूनही दिसेल असा भव्य
‘ वाळू स्तंभ ‘ उभारण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. त्याचे उपस्थितांनी घमेली, बादल्या आणि फावडी एकमेकांवर आपटून स्वागत केले. संमेलनाच्या निमित्ताने
काठ्यालाठ्यांचे खेळ, तलवारबाजी, सळ्या आणि आगीच्या गोळ्यांची फेकाफेक, शिव्यांची अंताक्षरी, डोळ्यावर पट्टी बांधून टेबलातील किंवा कपाटातील कॅश चोरणे, परस्परांच्या गळ्यातील (न कळता) सोनसाखळ्या लांबवणे अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. अशा रीतीने वाळूचोरांचे हे पहिलेवहिले आणि आगळे संमेलन (कोरोनाला न घाबरता) अत्यंत उत्साहात पार पडले.
*ताजा कलम* – या संमेलनात वाळू चोरांचे समाजाप्रती, देशाप्रती असलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना ‘ वाळू रत्न ‘ , ‘ वाळू श्री ‘ आदी स्वरूपाचे पुरस्कार शासनाने द्यावेत, तसेच वाळू चोरीचे कौशल्य आत्मसात करण्याचा दृष्टीने युवा वर्गासाठी डिप्लोमा कोर्सेस सुरू करावेत अशी आग्रही मागणी करण्यात आली.
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण
9850863262