शीर्षक वाचून काहींना (कदाचित)धक्का बसला असेल. पण वास्तवापासून पळण्यात किंवा अगदीच रामराज्याच्या स्वप्नात रमणे योग्य नाही. कारण घटना, कायदे , नियम काही सांगत असले तरी भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे, तो आपल्या नियमित जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आपण प्रत्येकजण थोड्याफार फरकाने भ्रष्टाचार करत असतो किंवा त्याला प्रोत्साहन देत असतो. भ्रष्टाचार हा शब्द उच्चारायला सुध्दा लाज वाटते इतका तो स्वस्त आणि सहज झालाय. एखादे काम भ्रष्टाचाराशिवाय झाले आहे असे कळले तरी फार सज्जन माणूस बेशुद्ध पडेल अशी परिस्थिती आहे.
भ्रष्टाचार हा सर्वांनी करायचा आणि त्याच्याच विरोधात घरात झोपाळ्यावर नाहीतर छान सोफ्यावर बसून गरमागरम चहा..कॉफी घेत चघळायचा विषय झाला आहे. कारण पुढच्याच क्षणी घराबाहेर पडल्यावर कोणत्यातरी कार्यालयात तो आपण करणार तरी असतो किंवा दुसऱ्याला प्रवृत्त करणार असतो. म्हणून याकडे वास्तवतेचे भान ठेवून बघितले पाहिजे. एक गोष्ट प्रत्येकाने ठामपणे स्वीकारली पाहिजे की भ्रष्टाचार हा कधीच संपणार नाही..आणि कलियुगात तर नाहीच नाही. ..
म्हणूनच मला व्यक्तिगत पातळीवर आणि प्रॅक्टिकली असं वाटतं की जी गोष्ट संपणारच नाही त्यामागे न लागता फारफार तर तिचं प्रमाण कमी तरी होईल का, त्यातही काही नैतिकता, मर्यादा पाळता येतील का यावर प्रत्येकाने विचार करावा. आजच सकाळी मी लाचखोरीबाबत पोस्ट लिहिली त्याचाच उत्तरार्ध म्हणून हा मुद्दा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न..
सर्वच कामं कायद्यानुसार, नियमानुसार होतात असं नाही किंवा करता येतात असं नाही. बरेचदा कायदा, नियम आणि व्यवहार याची सांगड घालावी लागते. अशावेळी थोडाफार भ्रष्टाचार होणे कळू शकते. ( अर्थात तो केलाच पाहिजे असं नाही. हा विषय ऐच्छिक आहे.) परंतु पैसा, संपत्ती यांचा हव्यास वाढत गेला तसतसा त्या त्या खात्यातील अधिकारी, कर्मचारी असोत, वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यावसायिक असोत प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचाराची कुरणं उभी राहिली. त्यात हे भ्रष्टाचारी सांड यथेच्छ चरत आहेत..पुढेही चरणार आहेत..अगदी आपलं आणि पुढील सातही पिढ्यांच पोट फुटेपर्यंत…कारण कुठेतरी थांबलं पाहिजे, थोडीतरी नैतिकता पाळायला हवी हे त्यांच्या गावीही नसते. डोळ्यांवर तर नोटांची झापडंच बांधलेली असतात. या सर्व भ्रष्ट यंत्रणेत नियमानुसार वागणाऱ्या, प्रामाणिक असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य माणसाची गोची होते. (अर्थात सर्वसामान्य माणूस हाही कधीकधी सोईनुसार वागत असतो. आपल्याला काय करायचं आहे..बघेल दुसरा ही वृत्ती वाढत चालली आहे. मी आपला घरातच काय ती तोंडाची वाफ दवडतो. यात मध्यमवर्ग पण ओघाने आलाच)
आपल्याकडे भ्रष्टाचार म्हटले की सर्वात आधी नजरेसमोर येतात ती खाती म्हणजे महसूल, पोलीस, बांधकाम, पाटबंधारे. अर्थात बाकीची सगळीच खाती कमी जास्त फरकाने येतातच. प्रशासनाचा कणा म्हणा, आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे महसूल खातं..इकडून तिकडून फिरून इथे यावं लागतच. ज्यांना फारच हौस आहे त्यांना पोलीस खातं आहेच. बाकीची ज्याच्या त्याच्या गरजेनुसार. खातं कोणतही असो येथे जी अडवणूक , पिळवणूक होते ती थांबली पाहिजे. कोणत्या दाखल्यासाठी, कामासाठी किती पैसे घेतले पाहिजेत, समोरच्याची काय परिस्थिती आहे याचा विचार झाला पाहिजे. पैसेवाला असो वा गरीब त्याला किती नाडायचं याचं तरी तारतम्य बाळगले पाहिजे. एखाद्याने स्वखुशीने देणं वेगळं आणि नाडून, पिळवणूक करून पैसे खाणं यातील मर्यादा पाळली गेली तर उत्तमच. तेरी भी चूप मेरी भी चूप…आणि त्यातूनही या वाईट मार्गाला जायचंय नसेल, कायदा..नियम याच चौकटीत राहून काम करायचं असेल तर तेवढं धाडस, तेवढा स्वाभिमान तरी दाखवला पाहिजे. मी कोणालाही विकला जाणार नाही..फारफार तर व्यवहार आणि कायद्याची सांगड घालून चांगलं काम करेन एवढी तरी धमक अंगात पाहिजे. असे अधिकारी, कर्मचारी होते, आजही आहेत आणि पुढेही मिळतील ..पण फार दुर्मिळ प्रमाणात..
बांधकाम, पाटबंधारे अशा खात्यांचा कारभार म्हणजे पैसे अडवा पैसे जिरवा…रस्ते, पूल, धरणं अशी जी काही विकासकामं होतात त्यात पुढारी, ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी यांचं चांगलंच साटेलोटे जमलेले असते. कोणतंही काम करताना मुळात जो फायदा मिळायला हवा तो मिळणार आहेच..फारतर आणखी पाच दहा टक्के ‘टक्केवारीत’ गेले असं गृहीत धरलं तरी उरलेल्या पैशात चांगली , टिकावू कामं करायला काय अडचण आहे… पण तिथेही हव्यास. डांबर , सिमेंट, खडी वाळूपासून सगळं खायचं. काहीवेळा तर कागदावरच कामं होतात आणि लाखो,करोडो पचवले जातात. मग रस्ते चार दिवसांत उखडतात, पूल दोन चार महिन्यात पडतात, धरणं फुटतात. माणसं मरतात. खरंतर कामाच्या खर्चात सगळे दृष्य अदृष्य खर्च पकडलेले असतात तरीही उरलेल्या पैशाचेही धड काम करायचे नाही ही कोणती नैतिकता….खा पण काम तरी चांगलं करा..जनतेच्या पैशातून होणाऱ्या कामांचे थोडे तरी सुख मिळू दे... कोणत्याही खात्यातल्या बदल्या ही तर दुभती म्हैसच..शिक्षक, आरोग्य अशा मोठ्या प्रमाणात कर्मचारी असलेल्या खात्यातील बदल्या म्हणजे सर्वांसाठी सुगीचे दिवस. महसूल, पोलीस, वन अशा खात्यांतील मलईदार ठिकाणं मिळवण्यासाठी अगदी वरच्या स्तरावर जी उलाढाल होते ती बघून प्रत्यक्ष कुबेरालाही फीट येईल. बाकी ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका येथील भ्रष्टाचाराच्या सुरस कथा काही नवीन नाहीत. अगदी टाचणीपासून गाड्याघोड्यांचे पेट्रोल डिझेल पिण्यापर्यंत इथे कशातही काही होऊ शकते. अपवादात्मक मंडळी सोडता बहुतांश पुढारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी, अधिकारी आणि ठेकेदार अल्पावधीत लाखो करोडोचे मालक कसे होतात…
राजकाणासाठी पैसा लागतो म्हणून कार्यकर्ते, पुढारी , लोकप्रतिनिधीच या ना त्या मार्गाने ठेकेदार बनतात आणि विकास कामांची काय बोंब होते याची उदाहरणं गावोगाव, तालुक्या तालुक्यात दिसतात. अर्थात सर्वसामान्य जनताही निवडणूक आणि पुढारी समोर आला की भ्रष्टाचार, विकास कामांची बोंब सगळं विसरून जिंदाबाद करायला तयार असते. त्याचेच फलित म्हणजे हा वाढलेला भ्रष्टाचार….
आणखी एक मुद्दा असा की कोणत्याही खात्यातल्या कर्मचारी वा अधिकारी असो त्याने आपल्या आपल्या पायरीनुसार, पात्रतेनुसार पैसे खावेत, लाच घ्यावी. कारकून, शिपाई, हवालदार, तलाठी पाच पन्नास रूपये घेत असेल तर जसजसे वर जाऊ त्या त्या योग्यतेनुसार लाच खावी..किमान आपल्या पदाचा तरी मान राखावा. जे अधिकारी, कर्मचारी या भ्रष्टाचारापासून लांब आहेत, आहे त्या पगारात समाधानी आहेत त्यांचा प्रश्नच येत नाही. त्यांना मनापासून मानाचा मुजरा…पण ज्यांना भ्रष्टाचार केल्याशिवाय चैन पडत नाही, शांत झोप लागत नाही, आपल्या कुटुंबाला त्या पैशातून ऐश करू द्यावी वाटते त्यांनी जमलं तर किमान एक करावं एखाद्या विशिष्ठ ठिकाणी आणि विशिष्ठ वयापर्यंत यातून बाहेर पडावं. कारण अशी अनेक उदाहरणे आहेत की मर्यादा न पाळल्याने, थोडीफार सुद्धा नैतिकता न पाळल्यामुळे, अति हव्यासामुळे नोकरीतून निवृत्त होण्याच्या दिवशी किंवा एखाद दोन दिवस आधी लाचलुचपतच्या सापळ्यात अडकले आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आपल्यासह संपूर्ण कुटुंबाला उध्वस्त करून घेतले. थोडीफार असलेली प्रतिष्ठाही गेली. स्वतःला, कुटुंबाला तोंड लपवून फिरण्याची वेळ आली. किमान एवढं पथ्य पाळले तरी इतकी वर्षे मिळालेला पापाचा पैसा, प्रतिष्ठा मरेपर्यंत टिकेल. बायको आणि मुलांनीही आपल्या बापाला (हल्ली आईला पण..लाच खाण्यात स्त्री पुरुष समानता प्रस्थापित झाली आहे.) विचारायला हरकत नाही..भ्रष्टाचार काही नवीन नाही पण किमान कुणाला नाडून, पिळवणूक करून तरी आणलेल्या पैशातून आपण मजा करतोय का… स्वखुशीचा मामला वेगळा आणि पिळवणूक करून मिळवलेला पैसा , संपत्ती वेगळी..त्याची हाय, शाप लागल्याशिवाय राहत नाही…
म्हणूनच प्रॅक्टिकली एकच विचार योग्य वाटतो..भ्रष्टाचार करा पण मर्यादेत…
मकरंद भागवत पत्रकार, चिपळूण
९८५०८६३२६२