चिपळूण -चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने व बेकायदेशीपणे कामे केल्याचा ठपका ठेवत काल सोमवारी महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीत अविश्वास ठराव आणण्यात आला. या बैठकीला महाविकास आघाडीचे २२ पैकी १८ सदस्य उपस्थित होते. नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याबाबत मतदान घेण्यात आले व अठरा सदस्यांनी हात वर करून मतदान केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
चिपळूण शहरातील पाग महिला विद्यालयाच्या सभागृहात सोमवारी ही बैठक झाली. या बैठकीचे अध्यक्षपद ज्येष्ठ नगरसेवक सुधीरशेठ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले. ५८/२ अधिकारचा गैरवापरसह नगराध्यक्षांनी केलेल्या १९ वादग्रस्त कामांचा पाढाच या बैठकीत वाचून दाखवण्यात आला. अखेर नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला. येत्या दोन दिवसात हा अविश्वास ठराव जिल्हाधिकाऱ्यांना दिला जाईल. नगराध्यक्षांच्या पूर्ण कारभाराची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी, असा ठरावही या वेळी शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक उमेश सपकाळ यांनी मांडला त्याला राष्ट्रवादीच्या बिलाल पालकर यांनी अनुमोदन दिले. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, माजी नगरसेवक शिरीष काटकर हेही सभागृहाबाहेर उपस्थित होते.