मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील शिवसेना आमदारांसोबत आज महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला कोकणातील गुहागरचे नाराज असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी दांडी मारली. त्यामुळे भास्कर जाधव यांची नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
आज कोकणातल्या विकासकामासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला कोकणातील सेना आमदार उपस्थित होते. मात्र भास्कर जाधव यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गुहागर मतदारसंघातून विजय मिळवला. आमदार झाल्यानंतर तसंच शिवसेना सत्तेत आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. तेव्हापासून ते सेनेवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या आधी सुध्दा भास्कर जाधव यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी आपली नाराजी याअगोदर देखील बोलून दाखवली होती. राष्ट्रवादीत असताना त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळलेली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सेनापक्षप्रमुख आपल्याला मंत्रिपद देतील, अशी आशा त्यांना होती.