लातुर – लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी (बु) येथे एका तेरा दिवसाच्या गोंडस मुलीचा पाण्याच्या टाकीत टाकून खून करण्यात आल्याची घटना आज घडली. या प्रकरणी पोलिसात प्रथमदर्शनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील हुडगेवाडी येथील एक महिला बाळंतपणासाठी झरी (बु) येथील माहेरी आली होती. तेरा दिवसापूर्वी तिने गोंडस मुलीला जन्म दिला होता. शनिवारी सकाळी अचानक घरातून ही मुलगी गायब झाली. यामुळे घरातील व्यक्तींनी मुलीचा शोध घेतला परंतू ती कुठेही आढळून आली नाही. काही वेळानंतर घरातील एका व्यक्ती पाण्याच्या टाकीचे झाकन काढून पाणी काढत असताना त्याला मुलीचा मृतदेह आढळून आला. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे, पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत भंडे, पोलीस कॉन्स्टेबल अर्जून तिडोळे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जानवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. याबाबत अधिक तपास करून पोलिसांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला जाणार आहे.