लांजा – लांजा तालुक्यातील खावडकरवाडी येथे भक्ष्याच्या शोधात फिरणाऱ्या बिबट्या भातशेतीत लावलेल्या फासकीत अडकल्याची घटना आज घडली. या बिबट्याची फासकीतून सुटका करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
लांजा खावडकरवाडी येथील चंद्रकांत गुरव यांच्या घराशेजारील भात शेतीला लागून फासकीत बिबट्या अडकला होता. बिबट्याच्या आवाजानंतर त्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर वन विभागाने तासाभरात बिबट्याची फासकीतून सुटका केली. या बिबट्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. बिबट्याची सुटका करण्याच्या मोहिमेत विभागीय वन अधिकारी र. शि. भवर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, वनपाल देवरुख सुरेश उपरे, वनपाल लांजा सागर पाताडे, वनरक्षक न्हानू गावडे, मिलिंद डाफळे, राहुल गुंठे यांनी सहभाग घेतला होता.