चिपळूण -चिपळूण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत अडरे -मांडवखरी या ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या उर्वरित कामकाज पूर्ततेसाठी राज्याचे माजी कामगार मंत्री तथा गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव यांनी दहा लाखांचा निधी जाहीर केला आहे .
तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत अडरे मांडवखरी या ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव यांनी या निधीची घोषणा केली आहे. ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या तळमजल्याचे उर्वरित कामकाज अजून शिल्लक आहे . या कामासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. आमदार जाधव यांनी इमारतीची पाहणी केल्यानंतर या इमारतीच्या कामकाजाचे कौतुक करून उर्वरित काम नियोजित प्लान प्रमाणे पूर्ण होण्यासाठी सदर निधी जाहीर केला आहे .या निधीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या उर्वरित कामांमध्ये सेमिनार हाँल व इतर तीन कक्ष त्याच प्रमाणे आवश्यकतेनुसार स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत . आमदार जाधव यांनी या कामासाठी दहा लाख रूपयांचा निधी जाहीर केल्यामुळे अडरे ग्रामपंचायतीचे सरपंच विजय सुर्वे, उपसरपंच राजन मुकनाक व व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच अडरेतील सर्व ग्रामस्थांनी आमदार जाधव यांचे आभार मानले आहेत . या कामासाठी अधिकाधिक निधी मिळवण्याचा प्रयत्न आपण करणार असून जिल्ह्यातील एक आदर्श ग्रामपंचायत भवन उभे करणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच विजय सुर्वे यांनी व्यक्त केली.
