शृंगारतळीचे प्रसिद्ध व्यापारी नासिम शेठ मालाणी माझ्याहून वयाने आणि अनुभवाने खूप मोठे पण तरीही गेल्या काही वर्षांपासून मी थोडाफार तरी त्यांच्या संपर्कात असतो. प्रत्येक हिंदू सणांना त्यांनी मला शुभेच्छा द्याव्यात आणि ईद असली की मी त्यांना द्यावी असे आदान -प्रदान होत असते. एखादा माणूस एकदा भेटला, पटला की त्याच्याशी सम्पर्क ठेवणारे हे प्रेमळ व्यक्तिमत्व !
काही दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य करोना पॉझिटिव्ह निघाल्याची बातमी कानावर आली आणि मी जरा बेचैन झालो. व्हाट्सअप वर एक दोनदा चौकशी करून झाली होती पण म्हटलं आज प्रत्यक्ष फोन करू.
“नक्की कोणाच्या संपर्कात आल्यामुळे मी पॉझिटीव्ह झालो माहिती नाही पण अचानक धाप लागली आणि तपासण्या केल्यावर कळलं की करोना झाला आहे. डॉक्टरनी धीर दिला आणि आम्ही रत्नागिरी मध्ये दाखल झालो. काहीनी मोठ्या शहरात जा , मोठ्या दवाखान्यात ऍडमिट व्हा असेही सांगितले. पण प्रवासचे अंतर आणि शरीराला होणारा ऑक्सिजन चा अपुरा पुरवठा त्यामुळे सरकारी दवाखान्यात दाखल व्हायचे ठरवले. आपला शेवटी विश्वास हवा कुठेतरी.” नासिम शेठ सांगत होते.
मी श्रवणभक्ती करत होतो. इतका मोठा व्यक्ती हा पण माझ्याशी एका मित्रासारखं मन मोकळं करत होता.” मोजून चार ते पाच दिवसात मी बरा झालो. व्हीलचेअर वरून आत गेलो तेंव्हाच ठरवलं होतं मनाशी की आठ दिवसात आपण ह्यातून बाहेर येणार आहोत. तिथे गेल्यावर मला ऑक्सिजन लावला होता . दोन तीन इंजेक्शन आणि सी- व्हिटॅमिन वगळता बाकी औषधांचा फार मारा नव्हता. आहार मात्र हलका घेत होतो.
डॉ आणि नर्सिंग स्टाफ झटून काम करत होता. मला असं वाटत होतं की ह्यात आपण ह्यांना सहकार्य करू होईल ते. आजूबाजूला खूप पेशंट होते. काही बरे झाले, तुरळक प्रमाणात मृत्यू पावले. पण मला असं वाटतं की लोक भीतीने जास्त आजारी होतात. तुम्हाला लढले पाहिजे. अंतर्मनाची शक्ती खूप महत्त्वाची!” –
इति नासिम शेठ. म्हटलं अगदी खरंय ! युद्ध मनात आधी जिंकाव लागत मग रणांगणात!
त्यांचा शब्द न शब्द उभारी देत होता, मरगळ झटकत होता. दवाखान्यात बेड वर असताना पण विनोद बुद्धी अखंड होती, ते ही एक दोन किस्से सांगायला ते विसरले नाहीत.
म्हटलं, ” काल राज ठाकरेंनी एबीपी माझाच्या मुलाखतीत सांगितलं , की मीडियामुळे लोक दहशतीखाली जात आहेत, त्यातून त्याना बाहेर काढायला हवं. ” मला पण हेच वाटतं. बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधोरेखित करून सांगितलं गेलं पाहिजे.
हा मुद्दा धरून मग ते म्हणाले ” हा आजार बरा होणार आहे नक्कीच पण लोकांनी धीर सोडता कामा नये आणि आजाराचा अवास्तव बाऊ करता कामा नये. औषधं हवीतच पण त्याच्याच जोडीला ज्या कोणा अल्लाहला , भगवंताला तुम्ही मानत असाल त्याच नामस्मरण सतत ठेवलं पाहिजे. माझा एक मित्र मला मनाचे श्लोक पाठवीत होता, ते ही मी वाचत होतो.” हे ऐकून तर मी थक्क झालो. म्हणाले “एका गिर्हाईक ने तर गुहागरच्या दुर्गादेवीला नवस केला आहे, आणि मला हक्काने सांगितलं की आपल्याला दर्शनाला जायचे आहे. त्याने हे माझ्यासाठी करावे ह्यातच सगळे काही कमावले मी. ” जवळपास ३५-४० मिनिटं आम्ही बोलत होतो आणि ते अनुभव कथन करीत होते. त्यांना म्हटलं हे शब्दबद्ध करा, अनेकांना प्रेरणा मिळेल ह्यातून.
सध्याच्या परिस्थितीत आपण आपली मानसिक ताकद व शारीरिक ताकद वाढवणे व करोना ग्रस्ताला व त्यांच्या कुटुंबातील लोकांना धीर देणे हेच महत्त्वाचे आहे, याचसाठी हा शब्द प्रपंच!