गुहागर – गुहागर तालुक्यात ३ जुन 2020 रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे गुहागर तालुक्यात अनेकांचे मोठे नुकसान झाले. शासनाच्या नियमानुसार त्याचे पंचनामे झाले शासनाने भरपाई दिली मात्र ती नुकसान भरपाई तहसील कार्यालय गुहागर आणि बँक यांच्यात समन्वयाचा अभावमुळे नुकसान ग्रस्तांच्या हातात मिळाली नव्हती त्यामुळे ही नुकसान भरपाई 21 तारखेच्या आत शेतकऱ्यांना मिळाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीने दिला होता.अखेर 20 तारखेला ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याने समाधान व्यक्त केले जाते.
निसर्गवादळ झाल्यानंतर ज्यांचं नुकसान झालं होतं त्यांचे रितसर पंचनामे होऊन त्याची खात्री करून शासनाकडून नुकसान भरपाईची रक्कम महसूल विभागाकडे जमा झाली. व संबधीतांची यादी बॅंक आॅफ इंडीया शाखा गुहागर यांच्याकडे पाठविण्यात आल्या.मात्र बँक व तहसिल कार्यालय यांच्यातील समन्वयाचा अभाव व नुकसानग्रस्तांच्या बाबतीतील निष्काळजी यामुळे आजपर्यंत ही रक्कम प्रत्यक्ष वादळग्रस्त गुहागरवासीयांच्या खात्यात जमा न झाल्याने संतप्त होत भारतीय जनता पार्टीने 20 तारखेपर्यंत ही नुकसान भरपाई संबंधितांच्या खात्यात जमा न झाल्यास तहसील कार्यालय गुहागर व बँक ऑफ इंडिया शाखा गुहागर यांच्या प्रवेशद्वारातच २१ आॅगस्ट रोजी ठिय्या मांडणार असल्याचे निवेदनाद्वारे सांगितले होते.
याची गांभीर्याने दखल घेत बँक व तहसील कार्यालयाने आपल्या कारभारात सुधारणा करत २० आॅगस्ट अखेरीस सर्व निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांची भरपाई त्यांच्या खात्यात जमा केली आहे.गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या या भुमीकेचे तालुकाभरातुन कौतुक होत असुन नुकसानग्रस्तानी गौरी- गणपतीच्या सणाच्या पार्श्वभुमीवर ही नुकसान भरपाई मिळाल्याने गुहागर भाजपला धन्यवाद दिले आहेत.