
चिपळूण : ‘आपली माणसं… आपली संस्था!’ हे ब्रीदवाक्य जपत सहकार क्षेत्रात विश्वास, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा निर्माण करणाऱ्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३३व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण बहादूरशेखनाका येथील संस्थेच्या सहकार भवन सभागृहात सकाळी १० वा. सहकार मेळावा आणि प्रगतशील शेतकरी व यशस्वी व्यावसायिकांचा सन्मान सोहळा होईल. तसेच सायंकाळी ४ वाजता चिपळूण नागरी परिवाराचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संस्थेच्या या वर्धापन दिन सोहळ्यातून सहकाराची परंपरा, कृषी क्षेत्रातील योगदान, व्यावसायिक यश आणि सामाजिक-सांस्कृतिक बांधिलकी यांचा संगम अनुभवायला मिळणार आहे.
१९ ऑक्टोबर १९९३ रोजी संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. पतसंस्थेने गेल्या अनेक वर्षांत सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सभासद, ठेवीदार, ग्राहक आणि हितचिंतक यांच्या विश्वासाच्या बळावर संस्थेची वाटचाल सुरू आहे. ‘आपली माणसं… आपली संस्था!’ या ब्रीदवाक्यातून जपलेली आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करत यंदाही वर्धापन दिन सोहळा साजरा केला जाणार आहे.

सहकार मेळाव्यातून मार्गदर्शन
वर्धापन दिनानिमित्त सकाळी १० वा. संस्थेच्या ‘सहकार भवन’ सभागृहात, सहकार मेळावा आणि प्रगतशील शेतकरी व यशस्वी व्यावसायिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला सेवा निवृत्त अपर आयुक्त तथा सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालय, मुंबईचे माजी अधिकारी एस. बी. पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था, पुणे येथील सेवानिवृत्त सहनिबंधक (पतसंस्था) मिलिंद सोबले, रत्नागिरीचे जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी, सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट (बिळाशी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
प्रगतशील शेतकरी आणि यशस्वी व्यावसायिकांचा गौरव
शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून, आधुनिक दृष्टिकोन, सातत्यपूर्ण मेहनत आणि नव्या संकल्पनांच्या बळावर शेतीत प्रगती साधणाऱ्या शेतकऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर उद्योग-व्यवसाय उभारून आर्थिक आणि सामाजिक विकासाला हातभार लावणाऱ्या व्यावसायिकांची भूमिकाही महत्त्वपूर्ण आहे. या दोन्ही क्षेत्रांतील कर्तृत्वाचा गौरव करण्याच्या उद्देशाने संस्थेच्या वतीने प्रगतशील शेतकरी व यशस्वी व्यावसायिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून शेती आणि व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेतली जाणार असून, नव्या पिढीला प्रगतीची प्रेरणा मिळण्यास मदत होणार आहे. संस्थेचे सर्व सभासद, ग्राहक आणि हितचिंतकांनी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.
















