445

तळवली – ( मंगेश जाधव ) – गुहागर तालुक्यातील वेळंब ग्रामपंचायतीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून महापुरुषांचे फोटो लावण्यात आले नसल्याचा आरोप पुढे आला आहे. शासनाचा जीआर असतानाही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचा दावा करत उपसरपंच श्रीकांत मोरे यांनी आठ दिवसांत महापुरुषांचे फोटो लावण्याची मागणी केली आहे. अन्यथा ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.स्वतः उपसरपंच असलेल्या याच ग्रामपंचायतीविरोधात उपसरपंचांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिल्याचा हा प्रकार तालुक्यात प्रथमच घडत असल्याची चर्चा सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात सहभागी असलेले उपसरपंच आता प्रशासनाविरोधातच आंदोलनाची भूमिका घेत असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
तंटामुक्ती अध्यक्ष संतोष नांदलस्कर यांनी दोन वर्षांपूर्वी ग्रामसभेत महापुरुषांचे फोटो लावण्याबाबत सूचना केली होती, तरीही कार्यवाही झाली नसल्याचे मोरे यांनी निवेदनात नमूद केले आहे. सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत त्यांनी आठ दिवसांची मुदत दिली आहे. महापुरुषांचे फोटो लावण्याचा विषय गंभीर असला, तरी उपसरपंचांनी यापूर्वी या प्रश्नावर कोणता पाठपुरावा केला होता? ग्रामसभेत भूमिका मांडली होती का? संबंधित अधिकाऱ्यांकडून अडचणींची माहिती घेतली होती का? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. स्वतः ग्रामपंचायतीच्या पदावर असताना आता थेट उपोषणाचा इशारा देण्यामागील नेमकी भूमिका काय, याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे.
हा विषय पुढे करून उपोषणाचा इशारा देण्यात आला असला, तरी या भूमिकेमागे प्रशासनाला जागे करण्याचा उद्देश आहे की राजकीय समीकरणांचा भाग, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र, कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी उपसरपंचांसह संबंधित पदाधिकाऱ्यांची भूमिका समोर येणे आवश्यक आहे. आता आठ दिवसांत महापुरुषांचे फोटो लावले जाणार की उपसरपंच प्रत्यक्ष उपोषणाला बसणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या निमित्ताने वेळंब ग्रामपंचायतीतील कारभार, शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी आणि उपसरपंचांच्या भूमिकेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here