वेळंब ग्रामपंचायतीत महापुरुषांचे फोटो तीन वर्षांपासून गायब; उपसरपंचांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने चर्चेला उधाण!
स्वतःच्याच ग्रामपंचायत कारभाराविरोधात उपसरपंच आक्रमक; जीआरच्या अंमलबजावणीसाठी आतापर्यंत काय प्रयत्न झाले? ग्रामस्थांमध्ये प्रश्नचिन्ह
गुहागर (प्रतिनिधी) : गुहागर तालुक्यातील वेळंब ग्रामपंचायतीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून महापुरुषांचे फोटो लावण्यात आले नसल्याचा आरोप पुढे आला आहे. शासनाचा स्पष्ट आदेश (जीआर) असतानाही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचा दावा करत उपसरपंच श्रीकांत सखाराम मोरे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला आठ दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत महापुरुषांचे फोटो लावले नाहीत, तर ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र, या इशाऱ्यामुळे गावात केवळ जीआरच्या अंमलबजावणीचीच नव्हे, तर उपसरपंचांच्या भूमिकेचीही चर्चा सुरू झाली आहे.
तंटामुक्ती अध्यक्ष संतोष नांदलस्कर यांनी दोन वर्षांपूर्वी ग्रामसभेत याबाबत सूचना केली होती, तरीही त्याची दखल घेतली गेली नसल्याचे मोरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
उपसरपंचांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह!
या प्रकरणातील चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रामपंचायतीच्या कारभारात सहभागी असलेल्या उपसरपंचांनी आता स्वतःच्याच ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे. ग्रामपंचायतीतील सत्ताधारी गटाशी त्यांचे संबंध आणि स्थानिक राजकीय समीकरणे लक्षात घेता, या भूमिकेमागील नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापुरुषांचे फोटो लावण्याबाबत शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसेल, तर उपसरपंचांनी यापूर्वी यासाठी कोणते प्रयत्न केले? ग्रामसभेत हा विषय मांडला होता का? संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन पाठपुरावा केला होता का? की आता उपोषणाचा इशारा देऊन हा विषय ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे? असे प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत.महापुरुषांचे फोटो लावण्याचा विषय हा केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा नसून शासनाच्या आदेशाच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रत्यक्षात काय अडचण होती, तीन वर्षे फोटो का लावण्यात आले नाहीत आणि जबाबदारी कोणाची, याची स्पष्टता येणे आवश्यक आहे. उपसरपंचांचा उपोषणाचा इशारा हा प्रशासनाला जागे करण्यासाठी आहे की त्यामागे अन्य राजकीय हेतू आहेत, याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे. मात्र, कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी संबंधितांची भूमिका समोर येणे महत्त्वाचे आहे. आता ग्रामपंचायत प्रशासन आठ दिवसांच्या मुदतीत महापुरुषांचे फोटो लावून प्रश्न निकाली काढणार की उपसरपंच प्रत्यक्ष उपोषणाला बसणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि उपसरपंच नेमकी काय भूमिका मांडतात, यावर पुढील घडामोडी अवलंबून राहणार आहेत.
















