शृंगारतळी – एकाच वीजमीटरवरून ४५ हून अधिक फ्लॅटधारकांसह व्यापारी गाळ्यांना वीजपुरवठा होत असल्याचे वृत्त ‘प्रगती टाइम्स’ने प्रसिद्ध करताच गुहागर तालुक्यात खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत महावितरणच्या भरारी पथकाने गुहागर–चिपळूण मार्गावरील शृंगारतळी येथल‘ मर्यांबी अपार्टमेंट’ येथे धाड टाकून वीजजोडण्यांची तपासणी सुरू केली आहे.
शृंगारतळी बाजारपेठेत महावितरणचा भोंगळ कारभार?एकाच मीटरवर 45 हून अधिक फ्लॅटधारकांसह व्यापारी गाळ्यांना वीजपुरवठा.?
अपार्टमेंटमधील प्रत्येक घराचा विद्युतभार, मीटरची क्षमता, मंजूर भार आणि वीजजोडण्यांची अधिकृतता तपासली जात आहे. एका मीटरवर एवढ्या जोडण्या कशा? त्यांना परवानगी कोणी दिली? नियमभंग आढळल्यास किती दंड होणार? या प्रश्नांची उत्तरे आता महावितरणच्या तपासणीतून समोर येणार आहेत. विशेष म्हणजे, या अपार्टमेंटमध्ये अनेक शासकीय कर्मचारी, शिक्षक आणि व्यावसायिक वास्तव्यास असल्याची चर्चा आहे. असे असतानाही या वीजव्यवस्थेबाबत यापूर्वी प्रश्न उपस्थित झाले होते का, यावरून गुहागर आणि शृंगारतळीत चर्चा सुरू आहे. मात्र, रहिवाशांना या व्यवस्थेची माहिती होती का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.‘प्रगती टाइम्स’च्या वृत्तानंतर तपासणी सुरू झाली असून; आता महावितरणच्या अहवालात काय उघड होणार आणि जबाबदारी कोणाची ठरणार? दंड किती लागणार ? याकडे संपूर्ण गुहागर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
















