283

गुहागर- गुहागर तालुक्यातील पालशेत येथे ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने शासनाने पावले उचलली आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) संयुक्त भागीदारीत प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव महिनाभरात सादर करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले. पालशेत येथील पर्यटन विभागाच्या मालकीच्या सुमारे १२५ एकर शासकीय जागेवर चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याची मागणी माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी शासनाकडे केली होती. गुहागर, दापोली परिसरातील निसर्गरम्य समुद्रकिनारे चित्रीकरणासाठी अनुकूल असतानाही आवश्यक सुविधा आणि परवानग्यांअभावी अडचणी येतात. हा प्रश्न सोडविण्यासाठी पालशेत, वेळणेश्वर आणि तवसाळ येथील शासकीय जागांचा उपयोग करण्याची सूचना त्यांनी केली. प्रकल्पासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीचा पर्याय तपासण्यासह चित्रपट पर्यटन योजनेंतर्गत निधी मिळविण्याबाबत आणि म्हाडाची मदत घेण्याबाबतही विचार करण्याचे निर्देश आशिष शेलार यांनी दिले. फिल्मसिटीमुळे कोकणात चित्रीकरणाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक रोजगार आणि पर्यटन व्यवसायाला मोठी संधी मिळू शकते. मात्र, प्रकल्पाचे प्रत्यक्ष स्वरूप आणि अंमलबजावणीचा निर्णय आता प्रस्तावानंतर स्पष्ट होणार आहे.बैठकीस माजी आमदार डॉ. विनय नातू दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, एमटीडीसीचे अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here