चिपळूण- चिपळूण शहरातील खेंड कांगणेवाडी येथे दरडीसह दोन महिन्यापूर्वी बांधलेली संरक्षक भिंतही कोसळल्याने या भागातील घरांसह एका बहुमजली इमारतीला धोका निर्माण झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली असून मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहाणी केली. दरम्यान, सुरक्षेची खबरदारी म्हणून नगर पालिका प्रशासनाने या भागातील ९ कुटुंबांना तातडीने स्थलांतरीत होण्याची नोटीस बजावली आहे.

गेले दोन दिवस चिपळूण परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. सातत्याने सरीवर सरी पडत असून या पावसामुळे खेंड कांगणेवाडी येथे दरड कोसळून संरक्षक भिंत देखील कोसळली आहे. एकाच ठिकाणी दोन सरंक्षक भिंत नगर पालिकेकडून उभारण्यात आल्या होत्या. यातील एक भिंत वर्षभरापूर्वी तर दुसरी दोन महिन्यांपूर्वीच अतिशय घाईघाईत उभारली होती. अनेक वर्षे याठिकाणी दरडीचा धोका आहे. २००२ मध्ये व त्यानंतर २००५ मध्ये देखील याठिकाणी संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली होती. त्यावर उपाययोजना म्हणून स्थानिक ठेकेदाराकडून सुमारे २५ लाख रूपये खर्चातून संरक्षक भिंत उभारण्यात आली होती. मात्र अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीतच संरक्षक भिंतीसह दरडही खाली आली आहे.
या दरडीच्या वरच्या भागात व पायथ्यालाही दाट वस्ती आहे. दरडीच्या वरील भागात जाधव, आणि शिंदे यांची घरे असून त्यांना तातडीने घर खाली करून स्थलांतरीत होण्याच्या सूचना करण्यात आल्या.तसेच दरडीच्या खालील बाजूस यतीन कानडे, प्रभूलकर यांची घरे आहेत. त्यालगत बहुमजली शुभम अपार्टमेंटची इमारत आहे. त्यांनाही धोका असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत साहित्य हटवण्याचे कामकाज सुरू होते. या घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी विशाल भोसले, नगर अभियंता दीपक निंबाळकर, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद साडविलकर आदींनी घटनास्थळी भेट देत पाहाणी केली. सद्यस्थितीत पावसाचा जोर कायम असल्याने संबंधीत कुटुंबांच्या स्थलांतरा व्यतिरीक्त कोणताही पर्याय राहिलेला नाही. मात्र पावसाचा जोर कमी होताच या ठिकाणी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे नगर पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.