वाई – ( प्रवीण गाडे) – जनतेचे रक्षकच जर भक्षक बनले, तर सामान्यांनी न्याय कुणाकडे मागावा? – असा संतप्त सवाल सध्या वाई तालुक्यात विचारला जात आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई येथील दोन पोलीस कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडले गेल्याने संपूर्ण तालुक्याच्या पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली आहे. या प्रकारामुळे वाई तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांत संतापाची भावना निर्माण झाली आहे. वाई वाई तालुक्यातील अनेक शासकीय विभागांमध्येही अशा प्रकारचे “छुपे रुस्तम” कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत अनेक वाईकरांनी व्यक्त केले आहे. लाचलुचपत करून सामान्य नागरिकांना वेठीस धरणे, त्यांच्यावर अन्याय करणे हे प्रकार खुलेआम सुरू असल्याचे स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनी सांगितले.
लाचखोरीच्या घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमी होत आहे.
काही पोलिसांच्या चुकीच्या वागण्यामुळे संपूर्ण पोलीस दलाला बदनाम व्हावे लागत आहे. चिरीमिरीसाठी चोर सोडून संन्यासाला फाशीचे प्रकार राजरोस सुरु आहेत. शहरातील गुन्हेगारीचा टक्का कमी होण्याऐवजी तो वाढतच चालल्याने जनतेमध्ये पोलिसांबद्दल नाराजी वाढत आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत शांतता ठेवण्याऐवजी वाई शहरात दिवसेंदिवस अशांतता पसरत चाल चालली असल्याचा घटना वाढत आहेत. या घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य ती कारवाई करावी व दोषींवर कठोर शासन करावे, अन्यथा जनतेला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा विविध संघटनांनी दिला आहे.