चिपळूण – राज्यभर सुनेचा छळ करून आत्महत्या केल्याच्या घटना समोर येत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मध्ये मात्र सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पुन्हा नव्याने गुन्हा दाखल करून मृताच्या सूनेसह तिच्या माहेरच्या आठ जणांविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ फेब्रुवारी २०२० ते ४ जानेवारी २०२२ या कालावधीत चिपळूण शहरातील मार्कडी येथील साईदर्शन अपार्टमेंटमध्ये सुनेच्या आणि तिच्या माहेरच्या नातेवाईकांच्या मानसिक छळाला कंटाळून अमरनाथ वामनराव कोवळे ५९ वर्षीय सासऱ्याने आत्महत्या केली होती. आता याप्रकरणी नव्याने गुन्हा दाखल करून मृताच्या सूनेसह तिच्या माहेरच्या आठ जणांविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 5 महिला व 3 पुरुष यामध्ये मंदार पोटफोडे, प्रसाद करडे, प्रशांत करडे यांचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद मृताच्या मुलाने दिली. १ फेब्रुवारी २०२० ते ४ जानेवारी २०२२ या कालावधीत हा छळ झाल्याचा आरोप आहे.
अमरनाथ कोवळे यांच्या मुलाचे आरोपी महिलेसोबत ०१ फेब्रुवारी २०२० रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपी पत्नीचे वागणे बदलले आणि ती घरात चांगल्या प्रकारे वागत नव्हती. तसेच ती सासू-सासऱ्यांचा अपमान करत असे. सासूने तिला वेळोवेळी समजावून सांगितले होते, मात्र तिच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. तिने आपल्या सासुलाही मानसिक त्रास दिला असे म्हंटले आहे. एवढेच नव्हे तर “स्वतःच्या जीवाला काहीतरी ओरखाडे करून त्याचे खापर तुमच्यावर फोडेन,” अशी धमकी देऊन सासू सासऱ्यांवर दबाव टाकत होती. याबद्दल तिच्या माहेरच्या लोकांनाही सांगण्यात आले. त्यांनी देखील मयताच्या मुलाच्या कुटुंबीयांना उलटसुलट उत्तरे दिली. आणि त्यांच्याशी अपमानास्पद, अर्वाच्य व अश्लील भाषेत बोलत होते. आरोपींच्या या मानसिक छळ, अपमानास्पद वागणूक आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमकीला कंटाळून अमरनाथ वामनराव कोवळे यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव करत आहेत.
 
             
		
