खेड – रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थ तस्करांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला खेड पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत तब्बल २ किलो ६६ ग्रॅम गांजा जप्त करत दोन आरोपींना ताब्यात घेतले. खेड पोलीस ठाण्याची ही सलग तिसरी मोठी कारवाई असून, या कारवाईमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या अमली पदार्थ विरोधी अभियानाला बळकटी मिळाली आहे. हे दोन्ही आरोपी एकाच ड्रग कार्टेलशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाणे प्रमुखांना विशेष सूचना दिल्या आहेत. याच सूचनांच्या अनुषंगाने खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार सातत्याने कार्यरत आहेत. एका एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्ह्याच्या तपासात अटक आरोपीने गांजा या अमली पदार्थाबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे खेड पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईहून एका पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून एक व्यक्ती मुंबई-गोवा महामार्गावरील शहरांमध्ये गांजा विक्रीसाठी येणार असल्याची ही माहिती होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक नितिन भोयर यांना समजली होती त्यावेळी त्यांच्या पथकाने भरणे नाका, खेड येथे गस्त सुरू केली. यावेळी त्यांना कमलेश उर्फ सुजल उर्फ रणजीत विचारे हा संशयित इसम आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून १ किलो ४४ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला.
तसेच त्याच रात्री तुतारी एक्सप्रेसमधून एक २०-२५ वयोगटाचा इसम हिरव्या रंगाच्या बॅगमध्ये गांजा घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची ही माहिती होती. या माहितीच्या आधारे खेड रेल्वे स्थानकावर पाळत ठेवली. असता रवींद्र प्रेमचंद खैरालिया हा व्यक्ती संशयितरित्या फिरताना आढळला. त्याच्या ताब्यातून खेड पोलीस ठाणे पथकाला १ किलो २२ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात आली आहे.प्राथमिक तपासानुसार हे दोन्ही आरोपी एकाच ड्रग कार्टेलशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. खेड पोलीस ठाण्यामार्फत या ड्रग कार्टेलच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्यालाही अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ही महत्त्वपूर्ण कामगिरी रत्नागिरी पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन भोयर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रूपेश जोगी, सुमित नवघरे, रोहित जोयशी, अजय कडू, राम नागुलवार, वैभव ओहोळ आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विक्रम पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.
 
             
		
