चिपळूण – रत्नागिरी येथे सापडलेल्या बांगलादेशी महिलेने सादर केलेल्या जन्म दाखल्याची चौकशी सुरू आहे. चिपळूण पंचायत समितीमधून हा दाखला देण्यात आला होता. मात्र मुळात हा दाखलाच संशयास्पद असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या जन्म दाखल्याची रजीस्टर वरील नोंद देखील देखील संशयास्पद राहीली आहे. या दाखल्याची पडताळणी करून त्याचा अहवाल चिपळूण पंचायत समितीकडून रत्नागिरी शहर पोलिसांना पाठविण्यात येणार आहे.
रत्नागिरी पोलिसांनी चिपळूण पंचायत समितीकडे सनमा खातून बिलाल मुल्ला उर्फ सनमा राहिल बोंबल यांच्या जन्म दाखल्याची पडताळणी करण्यास कळवले आहे. तसेच जन्म दाखल्याच्या रजीस्टरवरील नोदींची प्रत मागितली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सनमा बिलाल मुल्ला यांचा जन्म सावर्डे येथे १९९४ मध्ये झाल्याची नोंद घालण्यात आली. त्यांचा कायमचा पत्ता हा गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील दाखवला आहे. हा जन्म दाखला १८ मार्च २०२१ रोजी चिपळूण पंचायत समितीमधून देण्यात आला. अबिदा बिलाल मुल्ला यांनी ही जन्म नोंद केली आहे. चिपळूण पंचायत समिती प्रशासनाकडून दाखल्याची पडताळणी सुरू आहे. य जन्म दाखल्याच्या रजीस्टरची पडताळणी केल्यानंतर विविध संशयास्पद बाबी समोर येत आहेत. या दाखल्यावर गटविकास अधिकाऱ्यांचा शिक्का आहे. त्याखाली निबंधक जन्म मृत्यू अधिकारी असा शिक्का आहे.मात्र प्रत्यक्षात चिपळूण पंचायत समितीकडून देण्यात येणाऱ्या दाखल्यावर अप्पर निबंधक जन्म मृत्यू अधिकारी असा शिक्का मारला जातो. त्यामुळे या दाखल्यार संशय व्यक्त केला जात आहे. जन्म दाखल्यावरील नोंदीत देखील अनेक त्रुटी राहिल्या आहेत. संबंधीताने मागणी केल्याचा आवक क्रमांक देखील येथे टाकण्यात आलेला नाही. मार्च २०२१ मध्ये पंचायत समितीमध्ये जे गटविकास अधिकारी कार्यरत होते. त्यांची सही आणि प्रत्यक्षात दाखल्यावरील सही यात देखील फरक आहे. त्यामुळे हा दाखला चिपळूण समितीने दिली कि तो परस्पर तयार करण्यात आला, याबाबत उलट सुलट चर्चा.
रत्नागिरी पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार संबंधीत जन्म दाखल्याची पडताळणी पंचायत समितीकडून केली जात आहे. पडताळणी पुर्ण झाल्यानंतर याबाबतचा अहवाल सबंधीतांना पाठवला जाईल.
सौ. उमा घार्गे – पाटील गटविकास अधिकारी, पंचायत समिती चिपळूण