खेड – खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये पुष्कर कंपनीत (युनिट-२) काम करणारे दोन कामगार होरपळले आहेत. अचानक प्लॅन्टमध्ये आग लागल्याने ही दुर्घटना घडली. त्यांना उपचारासाठी चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची अद्याप नोंद झाली नसून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या अपघाताची चौकशी केली जाणार आहे.
लोटे एमआयडीसीत सातत्याने अपघातांची मालिका सुरू आहे. मध्यंतरी एकामागून एक येथील औद्योगिक वसाहतीमध्ये वायू गळती आणि स्फोटसारख्या घटना घडल्या होत्या. यामध्ये अनेक कामगार जखमी झाले होते. आता पुन्हा एकदा पुष्कर कंपनीमध्ये वायूगळतीमुळे आग लागून दोन परप्रांतीय कामगार जखमी झाले आहेत. या आधीदेखील पुष्करमध्ये आगीचा भडका उडून काही कामगार जखमी झाले होते. त्यानंतरही या कंपनीमध्ये अपघात घडत आहेत. जखमी कामगारांवर चिपळूण येथील लाईक केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या बाबत एमपीसीबीचे अधिकारी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबत आपल्याला अद्याप अहवाल मिळालेला नाही. मात्र, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कंपनीमध्ये आग लागल्याचे त्यांनी सांगितले व त्यात दोन कामगार होरपळल्याचे सांगितले.