गुहागर – गुहागर तालुक्यातील नरवण येथील ग्रामदेवत श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव देवीच्या मंदिर प्रांगणामध्ये उत्साहात पार पडला. यावेळी भक्तांच्या श्रध्देची परीक्षा घेणाऱ्या बगाडा सोहळ्यासाठी मुंबई, पुणे व राज्य भरातून आलेले पर्यटक तसेच भक्तांनी गर्दी केली होती.
नरवण येथेद देवीचा बगाडा पाहण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक दाखल होत असतात. त्यामुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. श्री व्याघ्रांबरी देवीचा देवदिवाळीतील बगाडा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. कार्तिक दर्श अमावस्येला सकाळी ग्रामदेवताशी व्याघ्रंबरी, वरदान, रवळनाथ, चंडिका, त्रिमुखी, महापुरुष, मानाई देवतांचे विधिवत पूजन केले जाते. देवीला रूपे चढविली जातात.त्यानंतर लाटेची पूजा केली जाते.सुमारे २५ फूट उंचीवर ठेवलेल्या ४० फूट लांबीच्या लाकडी लाटेला एका बाजुला दोरी असते. तर दुसऱ्या बाजुला लोखंडी आकडे असतात. हे आकडे मानाच्या व नवस फेडणाऱ्या भाविकाच्या पाठीवर टोवले जातात. त्यानंतर दोराने लाट खेचून त्या भाविकाला जमीनीपासून २५ फूट उंचीवर नेवून अधांतरी फिरवले जाते. यावेळी नवस फेडणाऱ्या भाविकाच्या एका हातात घंटा व दुसऱ्या हातात तांदूळ असतात. तर मुखात देवीचा नाम घोष करत, आकडे टुपले, नवस पावले असा जयघोष सुरु असतो. यालाच परंपरेने बगाडा असे म्हणतात.
मानवी शरीराला सुई टोचली तरी भळाभळा रक्त येते येथे मात्र पाठीत लोखंडी आकडे टुपवून २५ फूट उंचीवर अधांतरी फिरवले जाते. तरीही रक्त वाहणे, जखम होणे असे घडत नाही. आजपर्यंत कोणाला दुखापत झाल्याचेही ऐकिवात नाही. या बगाड्याची सुरुवात केव्हापासून झाली हे आजच्या पिढीला सांगता येत नाही. या देवीच्या साक्षात्काराला आव्हान देण्यासाठी ब्रिटीश काळापासून आतापर्यंत स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे अनेकजण पुढे आले. मात्र, देवीच्या श्रध्देचा साक्षात्कार झाल्यावर ते सुध्दा देवीचे भक्त झाले. देवीकडे बोललेले व पूर्णत्वास गेलेले नवस फेडण्यासाठी आकडे टुपवून घेताना त्या दिवशी सुर्योदयापासून आकडे टुपवून घेईपर्यंत तोंडातील थुंकीही पोटात न घेता भक्तगण उपवास करतात. यावर्षी १२ जणांनी आकडे टोचून घेतले. सुरुवातीला देवीचा मानाचा आकडा संतोष नरवणकर यांनी टोचून घेतला. आकडे टोवण्याचा मान गावातील जाधव कुटुंबीयांकडे असतो. या उत्सवासाठी व्याघ्रांबरी देवी देवस्थान मंडळ तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले.