चिपळूण — महाविकास आघाडीच्या जागा वाटपात रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नसली तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणीही नाराज होऊ नका, असे सांगितले असून त्यामुळे आम्ही कोणीही नाराज नाही. चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांना विजयी करण्यासाठी आम्ही संघटितपणे प्रयत्न करणार आहोत. विशेषत: ओबीसी- बहुजन समाजाने यादव यांना सहकार्य करावे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी शिक्षण समिती सभापती व काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवताना सुमारे ५२ हजार मते माजी जिल्हा परिषद सदस्य सहदेव बेटकर यांनी घेतले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेल्या सहदेव बेटकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या बाबत आपली भूमिका मांडताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी तर्फे प्रशांत यादव यांना उमेदवारी मिळाली आहे आम्ही महाविकास आघाडीचा धर्म म्हणून यादव यांचे आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे काम करणार आहोत. तत्पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही तरी कोणी नाराज होऊ नका, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. आपल्याला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे. तेव्हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे प्रामाणिकपणे काम करा, अशा सूचना आम्हाला केल्या आहेत. त्यामुळे तुम्ही कोणीही नाराज नाही. चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील ओबीसी- बहुजन समाजाने देखील यादवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन सहदेव बेटकर यांनी यावेळी केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे, अशी आपली प्रामाणिक भावना असून यामुळे आपण काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असून महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर देखील आम्हाला मानाचे स्थान मिळाले पाहिजे, अशी भावना या निमित्ताने बेटकर यांनी व्यक्त केली.