गुहागर – महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच बहुचर्चेत असणारा गुहागर विधानसभा मतदारसंघ हा महायुतीतून भारतीय जनता पार्टीच लढणार आणि नुसत लढणार नसुन महायुतीतून भाजपाचा विजय होणार असल्याचे भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी म्हटले आहे.
गुहागर विधानसभा मतदारसंघाबाबत नुकत्याच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि कोकणचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबत झालेल्या भेटीत गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुतीतून भाजपालाच मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत या तीनही वरिष्ठानी दिले आहेत.
हा मतदारसंघ गेली अनेक वर्ष युतीतून भाजपाच्या नेतृत्वात होता. मध्यंतरीच्या काळात काही बदल झाले असले तरी या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या मतदारांची संख्या ही लक्षणीय आहे. या मतदारसंघातून माजी आमदार डॉ. विनय नातू हेच पुन्हा नेतृत्व करणार आहेत. नातूंसारखा १६ वर्षाचा पूर्वानुभव असलेला, अभ्यासू शांत, संयमी चेहरा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे भारतीय जनता पार्टीसह महायुतीतील घटक पक्ष व विधानसभा मतदारसंघात नवचैतन्य आणि उत्साह आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ५ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे रत्नागिरी, दापोली असे २ आणि चिपळूण राष्ट्रवादीचा १ असे महायुतीतील घटक पक्षांचे ३ आमदार आहेत. राजापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना लढणार असल्याचे नक्की होत असताना एकमेव शिल्लक असलेला गुहागर विधानसभा मतदारसंघ हा भाजपच लढणार असल्याचे स्पष्ट संकेत वरिष्ठांनी दीड दोन वर्षापासूनच दिलेले आहेत. खरंतर रत्नागिरी जिल्ह्यात ५ ही विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार देण्याची क्षमता भारतीय जनता पार्टीमध्ये या क्षणाला नक्कीच आहे. मात्र, भारतीय जनता पार्टी हा पक्ष पक्षशिस्त आणि पक्षाचा आदेश मानणारा पक्ष असल्याने महायुतीतील सर्व घटक पक्षांचा आदर राखत आणि महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता येण्याच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यात फक्त एकमेव गुहागर विधानसभा मतदारसंघाकडे पूर्ण जिल्ह्या भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे. उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या नेतृत्वात या विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवरची भारतीय जनता पार्टीची पक्ष संघटनेची रचना पूर्ण झाली असून “मेरा बुथ सबसे मजबुत” या पक्षाच्या धोरणाप्रमाणे प्रत्येक बूथ वरती मोठे मताधिक्य घेण्याची भारतीय जनता पार्टीची महायुतीच्या माध्यमातून तयारी झाली आहे आणि म्हणूनच पक्ष संघटनेने मागील २ वर्षापासून सांगितल्याप्रमाणे गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुतीतून भाजपच लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले असल्याचे गुहागर भाजपा तालुकाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे यांनी सांगितले आहे.