चिपळूण – विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची जागा वाटपाची चर्चा जोरदार सुरू असतानाच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉंग्रेसला एकही जागा न देण्याची भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांनी घेतल्यामुळे कॉंग्रेसने बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत यादव यांचे नाव चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून पुढे येत असतांनाच याच मतदारसंघातून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती कमिटीचे उपाध्यक्ष सुनिल सावर्डेकर यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून ते दि. २५ ऑक्टोबरला अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील बंडखोरीला रत्नागिरीतून सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. अशातच शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर होणार्या या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. असे असतानाच महाविकास आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, कॉंग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यातही रस्सीखेच पहायला मिळत आहे, परंतु महाविकास आघाडीने प्रमुख घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसला तळकोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही जागा न दिल्याने कॉंग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. रत्नागिरीमधील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या बैठकीत उबाठा पक्ष व राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष हे कोकणात विरोधकांना संपवण्याबरोबरच कॉंग्रेसलाही संपविण्याचा घाट घालत आहेत. त्यांना वेळीच रोखण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे कार्यकर्ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरून निवडून येतील, असा विश्वास काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपण चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अनुसूचित जाती कमिटीचे उपाध्यक्ष सुनीलभाऊ सावर्डेकर यांनी स्पष्ट केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील कॉंग्रेस प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन सुनील सावर्डेकर यांनी केले आहे. त्यामुळे कोकणात कॉंग्रेसच्या बंडखोरीला सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.