चिपळूण – बदलापूर शाळेतील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणावरुन आज चिपळूण मधील महिलांच्या जनभावना उसळल्या. या घटनेचा आणि महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महिलांनी आज आंदोलन केले.आम्हाला लाडकी बहिण योजना नको सुरक्षित बहीण योजना हवी अशी मागणी संतप्त महिला आंदोलकांनी केली.
येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात महिलांनी आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदार आणि पोलीस ठाण्यात जाऊन महिलांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. शंभरहून अधिक महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.सुरक्षेच्या दृष्टीने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरुन कालुस्ते गावच्या सरपंच डॉ. रेहमत जबले यांनी भावना व्यक्त करत सरकारला धारेवर धरले..
जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला ? मुळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही
जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. असे शामल तटकरे यांनी सांगितले. असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, अंजली कदम यांनी सांगितले. रुही खेडेकर म्हणाल्या, अकोल्यामध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार झाला, बदलापूर मध्ये चिमूरड्यांवर अत्याचार झाला. सरकारला त्याचे गांभीर्य आहे की नाही. आम्ही आमच्या मुलींना शाळेत पाठवायचे की नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महाराष्ट्र मध्ये हा प्रकार आता खूप वाढू लागला असल्याचे सांगितले.