रत्नागिरी -महाराष्ट्रात गेले काही दिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने होत आहेत. यातच रत्नागिरी येथे परिचारिका असणाऱ्या मुळच्या देवरुख येथील १९ वर्षीय तरुणीसोबत रिक्षाचालकाने घृणास्पद कृत्य केल्याची संतापजनक घटना आज घडली. संबंधित युवतीला बेशुद्ध करून तिला शहरानजीकच्या चंपक मैदानातील जंगलमय भागात नेत रिक्षाचालकाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञाताविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संतापजनक घटनेमुळे रत्नागिरीत खळबळ माजली आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, हिंदू जनजागृती संस्थांसह सामाजिक संस्थांच्या पदाधिकार्यांनी रुग्णालयात धाव घेतल्याने वातावरण तंग झाले होते.
रत्नागिरी शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या परिचारिका प्रशिक्षण संस्थेत ही विद्यार्थिनी नर्सिंगच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. ती मुळची देवरुख येथील असून ती सध्या साळवी स्टॉप परिसरात वास्तव्याला आहे. प्रशिक्षण संस्थेत रविवारी सुट्टी असल्याने ती देवरुखला घरी गेली होती. सोमवारी प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहण्यासाठी सकाळी ती नेहमीप्रमाणे सहा वाजण्याच्या बसने देवरुखहून रत्नागिरीत आली. याठिकाणी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ती साळवीस्टॉप येथे उतरली. स्टॉपवरील रिक्षा न करता तिने जे.के.फाईल्स येथून रत्नागिरीच्या दिशेने जाणार्या एका शेअर रिक्षाला हात केला. यावेळी रिक्षा चालकाने रिक्षा वळवून उभी केली. त्यामुळे ही मुलगी रस्त्याच्या विरुध्द बाजुला रिक्षात बसण्यासाठी गेली. बसमधून उतरल्यामुळे थोडेसे अस्वस्थ वाटत होते. यावेळी रिक्षा चालकाने तिला पाणी पिण्यासाठी दिले. त्यानंतर आपण बेशुध्द झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
बेशुध्द अवस्थेतून जाग आली त्यावेळी ती चंपक मैदानातील झाडी व कचरा असलेल्या ठिकाणी पडलेली होती. तिचे कपडे अस्ताव्यस्त होते. हातावर ओखडले असल्याच्या जखमा होत्या. तिच्याकडील वस्तू इतरत्र टाकून दिलेल्या होत्या. सर्व वस्तू गोळा करुन तिने आपल्या बहिणीला मोबाईलवरुन कॉल केला. त्यावेळी सुमारे पावणेनऊ वाजले होते. वाहनांच्या आवाजावरुन ती रस्त्यावर आली. त्याठिकाणाहून येणार्या दुचाकीस्वाराला तिने हात दाखवला व आपल्या बहिणीशी बोलण करुन दिले. तोपर्यंत तिने आपल्या आईवडीलांना या घटनेची कल्पना दिली होती. बहिणीने सांगितल्याप्रमाणे दुचाकीस्वाराने तिला गर्दी असलेल्या चर्मालयाच्या चौकात आणून सोडले. याचवेळी तिच्या वडिलांच्या ओळखीचे व्यक्ती त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तिला ताब्यात घेऊन आपल्या फ्लॅटवर नेले. यानंतर तिचा चुलत भाऊ व अन्य नातेवाईक त्याठिकाणी फ्लॅटवर दाखल झाले. ही घटना घडे पर्यंत सव्वानऊ साडेनऊ वाजले होते. तिचे आईवडील दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या 112 हेल्पलाईनला कॉल करण्यात आला.
आईवडीलांनी व भावाने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याचवेळी पोलीसही जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. स्वत: अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी रुग्णालयात येत, तातडीने उपचार करण्याच्या सूचना रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांना दिल्या. त्यावेळी ती मानसिक तणावाखाली होती. या प्रकाराने हादरलेल्या मुलीकडून प्रत्यक्ष घटना जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यानुसार पोलिसांची पथके तातडीने सीसीटीव्ही व अन्य पुरावे गोळा करण्यासाठी रवाना झाले.
अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड यांनी तिला धीर देत, घटनाक्रम आणून घेतला. त्यानंतर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याशी चर्चा करुन त्यांनी मुलीच्या जबाबाप्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 64 (1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी जिल्हा रुग्णाल्यात दाखल झाले. समाज माध्यमांद्वारे हा प्रकार रत्नागिरी व जिल्ह्यात पसरल्यानंतर विविध भागातून जिल्हा रुग्णालयात लोक दाखल झाली. त्यामुळे संताप वाढत होता. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न लोकांकडून उपस्थित केला जात होता. जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी माईणकर, पोलीस निरीक्षक आदी घटनास्थळी लक्ष ठेवून होते.