मनसेचे प्रमोद गांधी यांचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील वाडीप्रमुख / अध्यक्ष यांना पत्राद्वारे केले आवाहन…. !

0
267
बातम्या शेअर करा

गुहागर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील वाडीप्रमुख / अध्यक्ष यांना पत्राद्वारे आवाहन केले आहे. आवाहन केलेल्या पत्रात म्हटले आहे की,
गाव वाड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संबंधित गाव-वाडी यांचे प्रमुख किवा अध्यक्ष यांचे योगदान मोठे असते. विकास करत असतानाच तो सामाजिक बांधिलकीही जोपासत असतो. वाडीतील सुख-दुःखाच्या प्रसंगी व संकटकाळात सर्वसामान्यांसाठी धावून जाणे, त्यांना मदत करणे यामध्येही त्याची भूमिका महत्वाची असते. केवळ त्याच्या या कर्तुत्वावरच विश्वास ठेऊन तेथील सर्वसामान्य लोक त्याचा शब्द प्रमाण मानून त्याला आपला प्रमुख नेमतात. अशा वाडीप्रमुख वा अध्यक्षाशी सुसंवाद साधण्यासाठी आमचा हा पत्ररुपी छोटासा प्रयत्न आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आमच्यावर विश्वास ठेऊन आम्हाला ग्रामीण भागात गाव-वाडीवार जाऊन तेथील लोकांचे प्रश्न, समस्या जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी नेहमीच प्रोसाहन दिले आहे. आज गाव-वाडीवार गुणवंत विद्यार्थी आहेत मात्र, गरिबीमुळे त्यांना पुढील शिक्षण आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. अनेक गरीब रुग्णांना महागडे उपचार पेलवत नाहीत त्यांनाही मदतीचा हात देणे आमचे कर्तव्य आहे. शासनाच्या योजनांचाही लाभ सर्वसामान्यांना मिळत नाही. त्यांना कोणीही पटवून देत नाही त्यामुळे ते खऱ्या योजनांपासून वंचित राहतात. ग्रामीण भागातील या सर्व गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. त्यामुळे राजकारण विरहीत विकास हेच ब्रीद घेऊन आम्ही वाडी, गाव व एकूणच तालुका यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आज प्रयत्नशील आहोत. यासाठी आम्हांला तुमच्यासारख्या समाजसेवकाचे सहकार्य अपेक्षित आहे.आज आपल्या गुहागर तालुक्याचा सर्वांगीण विकास पाहिला तर फारशी प्रगती झालेली नाही आपल्या मतदारांच्या माध्यमातून निवडून गेलेला लोकप्रतिनिधी पुन्हा पाच वर्षे गाव, वाड्यांपर्यंत येत नाही. ज्या गावातून चांगले मतदान होत नाही त्या भागाकडे लोकप्रतिनिधी अजिबातच फिरकत नाहीत. ज्या वाडीप्रमुख / अध्यक्षाने आपल्याला निवडणुकीत सहकार्य केले त्यालाही पाच वर्षे विचारत नाहीत. त्यांचा केवळ राजकीय वापर निवडणुकांपुरता केला जातो, ही सत्यस्थिती आहते. साहजिकच तेथील समस्या, प्रश्नांकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. त्यामुळे संबंधित वाडीप्रमुखाला तेथील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. एखाद्या वाडीप्रमुखाने संबंधित लोकप्रतिनिधीला निवडणुकीत अपेक्षित सहकार्य केले नाही तर अनेक प्रकारचा अप्रत्यक्ष राग व्यक्त करताना ते दिसतात. त्यामुळे आज गावांच्या विकासावर मोठा परिणाम झालेला आहे.
गुहागर तालुक्याचा अभ्यास केला तर आजही ग्रामीण भागातील रस्ते सुव्यवस्थित नाहीत. केले तरी ते दोन-तीन वर्षातच पावसाने वाहून जातात. खड्डे पडतात. अशावेळी वारंवार त्या रस्त्यावर खर्च टाकून शासनाच्या निधीचे नुकसान केले जाते. शासकीय पाणी योजनांची अवस्था त्याहूनही बिकट आहे. कित्येक गावांमधील स्वतंत्र वाड्यांच्या जलजीवनसारख्या मोठ्या महत्वाकांक्षी पाणी योजना रखडल्या आहेत. काही ठिकाणी निकृष्ट कामे झालेली आहेत. गाव-वाड्यांवर गंजलेले वीज खांब वा जीर्ण झालेल्या वीजवाहिन्या असो असे वीजेबाबतचे असंख्य प्रश्न धुळखात आहेत. कित्येक दुर्गम गावांमध्ये सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र असूनसुध्दा तेथील आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत. सर्वसामान्यांना खाजगी महागडे उपचार परवडत नाहीत. अंजनवेलच्या रत्नागिरी गॅस प्रकल्प क्षेत्रातील निरामय सारखे रुग्णालय आज कित्येक वर्षे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यात मोठे, सुसज्ज रुग्णालयच नाहीत. बेरोजगाराची समस्या ही गुहागर तालुक्याच्या पाचविलाच पूजलेली आहे. तालुक्यात कोणताही उद्योग नाही. रत्नागिरी गॅस प्रकल्प आहे तोही डबघाईला आला असून अनेक स्थानिक तरुणांना कामावरुन काढून टाकण्यात आल्याचे भयानक वास्तव आहे. तालुक्याला विशाल समुद्रकिनारा, चांगला निसर्ग लाभूनही पर्यटनाच्या दृष्टीने येते कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले येथील उद्योग-व्यवसाय ठप्प आहेत. हॉटेल, लॉज, घरगुती खाणावळी असे लहान-मोठे व्यवसाय चालविताना स्थानिकांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. हेदवी, वेळणेश्वर या तीर्थस्थळ व पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्तेच व्यवस्थित नाहीत. पुरातन मंदिरे, गड-किल्ले दुर्लक्षित आहेत. गुहागर-विजापूरसारखा राष्ट्रीय महामार्ग होऊनही या रस्त्याच्या निकृष्ट झालेल्या कामांकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलेले आहे.एकूणच गुहागर तालुक्याच्या विकासाची ही झालेली दुर्दशा आपणासारख्या वाडीप्रमुख समाजसेवकाला अजिबात रुचणार नाही. त्यामुळे आपणाला हे ज्ञात व्हावे, वाडीचे प्रश्न, समस्या जाणून घ्यावेत यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहचणार आहोत. प्रारंभी या पत्ररुपी सदिच्छेतून आपणाला आम्ही प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुमच्या वाडीच्या विकासासाठी जे काही सहकार्य तुम्हाला आमच्याकडून अपेक्षित आहे, ते पूर्ण करण्यास आम्ही बांधील आहोत. मराठी माणसाच्या हितासाठी, विकासासाठी मा. राजसाहेब ठाकरे हे नेहमीच आम्हाला मार्गदर्शक ठरले आहेत. त्यामुळे आम्ही हे समाजसेवेचे पाऊल उचलले आहे. यासाठी मोबाईल नंबर ९०९०४८८४८८ येथे संपर्क साधावा, असे विनम्र आवाहनही प्रमोद गांधी यांनी केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here