मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथे उड्डाणपुलाचे काम करताना तीन कामगार पडून जखमी

0
344
बातम्या शेअर करा

चिपळूण -मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथे गेल्या नऊ महिन्यांपूर्वी पुलाच्या गर्डरसह क्रेन कोसळण्याची घटना घडली असतानाच आज संध्याकाळी पुन्हा चिपळूण मध्ये उड्डाणपुलाच्या पिलरवरून दोन ते तीन कामगार काम करताना जमिनीवर पडून जखमी झाल्याची घटना घडली आहे. या जखमींना जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीककरणाचे काम सुरू आहे. यामध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटर दरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत हा उड्डाणपूल चेतक ईगल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून बांधण्यात येत आहे. साधारणपणे या पुलाची लांबी १८४० मीटर, तर रुंदी ४५ मीटर इतकी असून हा पूल कोकणातील महामार्गात सर्वाधिक लांबीचा ठरला आहे. या पुलासाठी एकूण ४६ पिलर उभारण्यात आले असून दरम्यान बहादूरशेखनाका येथे १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाच्या गर्डरसह क्रेन कोसळण्याची घटना घडली. दरम्यान, यावेळी पुलाच्या गर्डरला गेलेली तडा पाहणीस गेलेल्या आमदार शेखर निकम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते थोडक्यात बचावले होते. यानंतर चिपळूण बहादूरशेखनाका येथील गर्डर हटवण्यात आले आहेत. तर या दुर्घटनेची समितीने पाहणी केल्यानंतर दोन पिलरमध्ये आणखी एक पिलर उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार गेल्या काही महिन्यांपासून या कामाला सुरुवात झाली आहे. ते काम सुरू असताना आज चिपळूण शहरातील हॉटेल वैभव समोरील पिलरचा काही भाग बाजूला काढताना पिलरवरून दोन ते तीन कामगार जमिनीवर कोसळून जखमी होण्याची घटना घडली आहे.
यावेळी कामगारांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने कोणतीही साधने नसल्याचे यावेळी निदर्शनास आले आहे. यावरून ठेकेदार कंपनीने कामगारांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने निष्काळजीपणा केल्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here