मार्गताम्हाने – चिपळूण तालुक्यातील उभळे गावच्या हद्दीत एका मोठ्या उघड्या चिरेखाणीत रसायनमिश्रीत घातक पदार्थांनी भरलेल्या गोणी सोमवारी आढळून आल्या. या गोणीमध्ये निळ्या रंगाचा घातक पदार्थ असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून या गोणींवर मातीचा भराव टाकण्यात आला आहे. या प्रकारामुळे ऐन पावसाळ्यात वाहणाऱ्या नदी-नाल्यांच्या बाबतीत धोकादायक स्थिती निर्माण झाली असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे ज्याची चिरेखाण आहे. त्या खाणमालकावर कारवाई करण्याची मागणी या ठिकाणची ग्रामस्थ करत आहेत.
कळमुंडी-तनाळी जवळच्या व उभळे गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात उघड्या चिरेखाणी आहेत. यातील एका चिरेखाणीत सुमारे 700 घातक पदार्थाने भरलेल्या गोणी टाकलेल्या दिसून येत आहेत. निळ्या रंगाचा हा पदार्थ असून त्यावर मातीचा भराव टाकण्यात आला आहे. गेले दोन दिवस पाऊस पडल्याने या गोणींवरचा मातीचा भराव बाजूला झालेला आहे. पावसाळ्यात या उघड्या चिरेखाणी तु़डूंब भरतात. प्रसंगी रानावनात चरण्यासाठी गेलेली गायी-गुरे पाण्याने भरलेल्या या खाणीत पाणी पिण्यासाठी जातात. तसेच येथूनच एक नदी वाहते. या नदीला चिरेखाणींमधील पाणी वाहत जाते. ही नदी गुढे गावाला जाऊन मिळत असल्याची माहिती येथील एका शेतकरी ग्रामस्थाने दिली.
नदी-नाल्यांमध्ये चिऱेखाणींमधील पाणी गेल्यास हा घातक पदार्थ मिसळून आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच गायी-गुरे यांच्या आरोग्यालाही बाधा होऊ शकते. त्यामुळे महसूल प्रशासनाने येथे पाहणी करुन हा घातक पदार्थ नेमका कोणता आहे, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, यासाठी त्याचे नमुने घेऊन संबंधित प्रयोगशाळेत पाठवावे, जेणेकरुन भर पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच या प्रकरणाची चौकशी करुन संबंधित चिरेखाण मालक कोण, या गोणी येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात कुणी आणून टाकल्या याचा शोध घ्यावा, व कारवाई करावी, अशी मागणी येथील शेतकरी ग्रामस्थांनी केली आहे.