मार्गताम्हाने – चिपळूण तालुक्यातील उभळे गावच्या हद्दीत एका
मोठ्या उघड्या चिरेखाणीत रसायनमिश्रीत घातक पदार्थांनी भरलेल्या गोणी सोमवारी आढळून आल्याचे सडेतोड वृत्त प्रगती टाइम्सने प्रसिद्ध करताच चिरेखाण मालक-चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यातच आज सगळीकडे उघड्या खाणींची पाहणी करण्यात येत होती. त्यावेळी पुन्हा सुमारे 1 हजार गोणी आढळून आल्या आहेत. त्यामुळे अखेर चिपळूण तहसिलदारांनी चिरेखाणीचा मालक शोधण्याचे आदेश मार्गताम्हाने विभागाच्या महसूल यंत्रणेला दिले आहेत. याप्रमाणे मंडलअधिकारी, तलाठी हे सर्व कामाला लागले असून अद्याप तरी खाणमालकाचे नाव समोर आलेले नसल्याचे चौकशीअंती सांगण्यात आले.
चिपळूण ; चिरेखाणीत आढळल्या घातक पदार्थांच्या गोणी, मातीचा भराव टाकून बुजविण्याचा प्रयत्न
या गोणीमध्ये निळ्या रंगाचा घातक पदार्थ असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून या गोणींवर मातीचा भराव टाकण्यात आला आहे. या प्रकारामुळे ऐन पावसाळ्यात वाहणाऱ्या नदी-नाल्यांच्या बाबतीत धोकादायक स्थिती निर्माण झाली असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. चिरेखाणी मोठ्या असल्याने आणखी गोण्यांचे ढीग सापडण्याची शक्यता आहे. मंडल अधिकारी मधुरा कदम, तलाठी साळुंखे, उभळे सरपंच प्रज्ञा कांबळे, पोलिसपाटील अनंत चिखलकर, पोलिसपाटील नितीन थूल, माजी सरपंच प्रमोद कांबळे, रामपूर बीटचे पोलीस कदम व ग्रामस्थ राघू कुंभार यांनी आज पाहणी केली. ग्रामपंचायत प्रशासनानेही तहसिलदारांना पत्रव्यवहार करुन चौकशीची व कारवाईची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.