चिपळूण -चिपळुण तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत असून रोज नव्याने वाढण्याची रुग्ण संख्या पाहता चिंता वाढली आहे. आज गुरुवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तब्बल 29 कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून आतापर्यंत 371 रुग्ण आढळले असून आता त्यामध्ये नव्याने तब्बल 29 रुग्णांची भर पडली आहे. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे चिपळूण तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
चिपळुणात गेल्या २४ तासांत तब्बल ४८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये बुधवारी रात्री आलेल्या अहवालात गोवळकोटरोड येथे २, कापसाळ ३, पेठमाप १, गोवळकोट ५, चिपळूण शहर १, पिंपळी १, खेर्डी ६ असे १९ रुग्ण सापडले तर गुरुवारी दुपारी आलेल्या अहवालात तब्बल २९ लोकांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. तर चिपळुणात आतापर्यंत ३७१ रुग्ण सापडले आहेत. कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर त्या ठिकाणचा परिसर अथवा इमारत प्रशासनाच्या मार्फत केली जाते. या ठिकाणी आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र, दररोज कोरोना बाधित रुग्ण सापडत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिपळूणवासीयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.