चिपळूण – पोलिसांबद्दल अनेक मतमतांतरे असली तरी सर्वच ठिकाणी कर्तव्य बजावणारा पोलीस हाच महत्वाचा घटक असतो. सुख-दुःखाच्या क्षणी पोलीसच समोर असतात. पोलीस ‘सद् रक्षणाय् खल निग्रणाय्’…या ब्रिद वाक्याप्रमाणे कर्तव्यदक्ष असतात. त्यांच्यातील माणुकीचे दर्शन यावेळी घडले. दोन दिवस आपल्या सान्निध्यात असलेल्या मुलाला नातेवाईकांच्या स्वाधीन करताना पोलिसांच्याही डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. पोलिसांच्या माणुसकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
चिपळूण पोलीस ठाणे येथे शनिवारी दि २५ नोव्हेंबर रोजी एका इसमाने छत्तीसगड येथे राहाणारा व मानसिकरित्या अस्थिर मुलगा आमेश्वर कृष्णा राम यादव (१९, रा. छत्तीसगड) यास पोलीस ठाण्यात आणले, सदर इसमाची पोलीस उप निरीक्षक पूजा चव्हाण आणि टीमने अत्यंत आस्थेवाईकपणे वागणूक देवून चौकशी केली. त्याचा विश्वास संपादन करून त्याची सर्व माहिती विचारुन घेतली व त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. यावेळी नातेवाईकांना चिपळूणला यायला दोन दिवस लागणार होते. दरम्यानच्या काळात चिपळूण पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याची राहायची, जेवणाची आणि औषधोपचाराची व्यवस्थित काळजी घेऊन त्यास सांभाळले.
दरम्यान सोमवार दि. २७ नोव्हेंबर रोजी त्याचे नातेवाईक छत्तीसगडहून चिपळूण पोलीस ठाण्यात आले असता आमेश्वरला सुखरूप त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात सोपविण्यात आले. आपला मुलगा एवढ्या लांब आला व केवळ चिपळूण पोलिसांमुळेच सुखरुप मिळाल्याने त्याच्या नातेवाईकांच्या आनंदाला पारावर राहीला नाही. चिपळूण पोलिसांची प्रेमळ आणि माणुसकीची वागणूक अनुभवून ते सर्व भारावून गेले आणि त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. उपविभाय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे या चांगल्या कामगिरीबद्दल कौतुक केले.