चिपळूण – चिपळूण शहरातील मार्कंडी येथील पूरबाधित जागेत वन विभाग परवाना नसताना बेकायदेशीर व अनधिकृतपणे इमारती बांधत आहे. त्यासाठी नगर परिषदेची परवानगी घेण्यात आलेली नाही. यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडे केली आहे.
चिपळूण नगर पालिका क्षेत्रामध्ये वनविभागाचे मार्कंडी येथील विभागीय कार्यालयाचे मिळकतीमध्ये मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरु असून येथे प्रशस्त इमारती उभारल्या जात आहेत. या कार्यालयाकडे प्राथमिक चौकशी केली असता नियोजित बांधकामासाठी नगर परिषद कार्यालयाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगण्यात आले. वन विभाग आपल्या जागेत ३ ते ४ इमारती उभारत आहे. ज्या जागेत या इमारती होत आहेत, ती जागा पूर नियंत्रण रेषेच्या निर्बंधामुळे बाधित होत आहे. त्यामुळे तेथे बांधकाम करण्यास परवानगी देता येत नाही. त्यामुळे हे बांधकाम करताना बांधकाम नियमावलीचे उल्लंघन होत आहे. तरी विनापरवाना बेकायदेशीर रित्या सुरु असलेल्या या बांधकामास तत्काळ स्थगिती देण्यात यावी व संबंधितांविरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे. त्यामुळे आता मुख्याधिकारी शिंगटे नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.