चिपळुण – चिपळुण तालुक्यातील खेर्डी येथील महिलांना स्वप्नतेज अर्बन निधी या कोअर बँकींग मधुन घेतलेल्या अवघ्या ४५०० /- रुपयांच्या कर्जापोटी महिलांकडून दामदुप्पट वसुली करण्यासाठी अश्लील शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिल्याबाबत स्वप्नतेज अर्बन निधी लिमिटेड, कोअर बँकींगच्या सुशांत जाधव रा.आरवली ता.संगमेश्वर याचेविरुद्ध चिपळुण पोलीसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.
सदर तक्रारीमध्ये निशा लाड रा.खेर्डी विकासवाडी यांचेसह अन्य ४ महिलांनी सुशांत जाधव याच्या स्वप्नतेज अर्बन निधीमधुन घेतलेल्या कर्जाचा एक हप्ता न भरल्याने सुशांत जाधव यांनी अश्लील शिविगाळी व दमदाटी करुन ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद असुन वैष्णवी महाडीक व स्वप्नाली चव्हाण नामक महिला आमच्या घरी आल्या व त्यांनी साखळी पद्धतीने कर्ज देवुन आमची फसवणुक केल्याचेही नमुद केले आहे.
पोलीसांवर राजकीय दबाव..?
तक्रार देवुन पंधरा दिवस झाले तरी अद्यापही संबंधीतांवर कोणतीच कारवाई झालेली नसल्याने चिपळुण पोलीसांवर राजकीय दबाव आहे का याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे.
अर्बन निधी म्हणजे बँक नव्हे, तिच्यावर शासनाचे निर्बंध नाही…….
अर्बन निधींवर व्याजाच्या आकारणीबाबत शासनाचे निर्बंध नसल्याने व्याजदराच्या आकारणीवर मर्यादा नसतात त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न संचालक मंडळ करते.अर्बन निधी म्हणजे बँक नाही हे लोकांनी लक्षात घेवुन आपल्या ठेवींबाबत व व्याजदराबाबत अर्बन निधीसोबत व्यवहार करताना जागरुक राहणे गरजेचे आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहकांची आर्थिक पिळवणुक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असुन कोणाचीही अशी पिळवणुक होत असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा आर्थिक गुन्हे विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे तक्रार करुन दाद मागावी असे आवाहन करण्यात येत आहे.